The administration woke up after the increase in accidents at Dharur Ghat
अतुल शिनगारे
धारूर, पुढारी वृत्तसेवा: खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील धारूर घाटासह सुमारे १२ किलोमीटरचा रस्ता अरुंद व धोकादायक असल्याने गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेषतः धारूर घाटातील सुमारे चार किलोमीटरचा डोंगराळ पट्टा आणि त्यावरील आठ ते नऊ तीव्र वळणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. वाढत्या अपघातानंतर आता या मार्गाचे सर्वेक्षण केले जात असले तरी हा केवळ दिखावा तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धारुर घाटातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) लातूर यांच्या अखत्यारित वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर घाटासह संपूर्ण १२ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून रविवारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग लातूरच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर पाहणी व सर्वेक्षण केले. धारूर घाट हा खामगाव-पंढरपूर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा पण तितकाच धोकादायक टप्पा मानला जातो. अरुंद रस्ता, तीव्र चढ-उतार, धोकादायक वळणे, अपुरी संरक्षक भिंत तसेच ठिकठिकाणी तुटलेले कठडे यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
विशेषतः पावसाळ्यात व रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण अधिक वाढते. गेल्या काही वर्षांत येथे जड वाहनांचे अपघात होऊन अनेकदा वाहतूक ठप्प झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ता पीडब्ल्यूडी लातूरकडे वर्ग झाल्यानंतर विभागाने तत्काळ हालचाली सुरू केल्या असून अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घाटासह संपूर्ण १२ किमी मार्गाची पाहणी केली. या सर्वेक्षणात रस्त्याची विद्यमान रुंदी, वळणांची तीव्रता, अपघातप्रवण ठिकाणे, दुरुस्तीची आवश्यकता, संरक्षक भिंती, साईड पट्टे व ड्रेनेज व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आला.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी आवश्यक अंदाजपत्रक तयार करून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम हाती घेण्यात येईल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या कामामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहनचालकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.