गेवराई : बीडमधील गेवराईतील एका गावखेड्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गुरुजी चक्क दारू ढोसून ज्ञानदान करत असल्याचा प्रकार आज सोमवारी उघडकीस आला असून, सदरील शिक्षकांविरुद्ध ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुधाकर कुलकर्णी असे या गुरुजींचे नाव आहे.
श्रीपत अंतरवाला(ता.गेवराई जि.बीड)जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शाळा आहे.एकूण चाळीस विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास दोन शिक्षक आहेत. मात्र मागील पंधरा दिवसापासून एका शिक्षकाची इतरत्र नियुक्ती झाल्याने ही शाळा एक शिक्षकी बनली असताना,त्यातच असलेले शिक्षक महोदय, चक्क बिस्लरी बाटलीत दारु ओतून वर्ग सुरु असतानाच दारू ढोसून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असल्याचा प्रकार गावातील काही सुजाण नागरिकांनी आज उघडकीस आणला.
सदरील शिक्षकांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहीती येथील सरपंच उमेश आरदड यांनी दिली.तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात बाटलीतील पाणी अन् गुरुजी सुधाकर कुलकर्णी यांचे मेडिकल टेस्ट करण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात आले.उद्याची भावी पिढी घडवणारे चक्क विद्यार्थ्यांसमोरच दारू पिऊन ज्ञानार्जन करत असल्याने पालकातुन संताप व्यक्त होत आहे.