Take action against unauthorized cafes in Majalgaon
माजलगाव, पुढत्तरी वृत्तसेवा : माजलगाव शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या काही कॅफेंमध्ये कथित गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित कॅफेंवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आमदार प्रकाश सुंदरराव सोळंके यांनी माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे.
शहरातील काही कॅफे कोणतेही आवश्यक परवाने न घेता सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना तसेच शॉप अॅक्ट परवाना नसतानाही हे व्यवसाय सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, संबंधित कॅफेंमध्ये अल्पवयीन मुला-मुलींची ये-जा वाढली असून काही ठिकाणी गैरप्रकार घडत असल्याची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. काही मुलींवर जबरदस्तीने अत्याचार होत असल्याच्या घटनाही समोर आल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित कॅफे बंद करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात सीबीसी कॅफे, बेकर्स लॉन्ज कॅफे, अमोवीज कॅफे, डब्ल्यू.एस. कॅफे, कट्टा कॅफे आणि सोअल्ला कॅफे या कॅफेंची नावे नमूद करण्यात आली असून या सर्व ठिकाणांची तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या निवेदनाची प्रत बीड जिल्हा पोलिस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे. या निवेदनामुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील कॅफे व्यवसाय आणि तेथील हालचालींबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेते आणि पुढे कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातत्याने तपासणी गरजेची
शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या काही कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याची ओरड अनेक महिन्यांपासून होत होती. परंतु याकडे पोलिस प्रशासनाने तेवढ्या गांभीयनि पाहिले नाही. परिणामी एका मुलीच्या छेडछाडीची घटना घडली. या घटनेनंतर तरी दामिनी पथकाने सातत्याने या सर्व कॅफेंची तपासणी करावी तसेच गैरप्रकार आढळणाऱ्या ठिकाणी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.