Fertilizers Shortage : खतांची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई करा file photo
बीड

Fertilizers Shortage : खतांची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई करा

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आदेश; बीड जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

Take action against those creating an artificial shortage of fertilizers

बीड, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक दादाराव जाधव यांच्यासह संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या तसेच विशिष्ट कंपनीचे उत्पादन घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी. कृषी विभागाच्या भरारी पथकांनी वेळोवेळी कृषी केंद्रांना भेट देऊन तपासणी करावी, तसेच टोल फ्री क्रमांकावर प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. कृषी केंद्र दुकानदारांनी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांवर कोणतीही अट लादू नये, अन्यथा संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यात गायरान जमिनीसह इतर ठिकाणी चारा लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यास सांगितले. पीक कर्ज वितरणाबाबतही त्यांनी बँक अधिकाऱ्यांना सूचना देत जिल्ह्यात १०० टक्के पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर दिला. कर्ज वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असे ही त्यांनी सांगितले.

साडेआठ लाख हेक्टरवर होणार पेरणी

सुरुवातीस प्रास्ताविकात आत्माचे प्रकल्प संचालक तथा प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी खरीप हंगाम जून २०२६ पासून सुरू होत असल्याची माहिती दिली. यात बीड जिल्ह्यात १०.६८ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून सरासरी ८.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवड केली जाते. असे सांगून त्यांनी बि-बियाणांसह खत साठ्याची माहिती, पिक विमा, पिक कर्ज, मृदा तपासणी, शेतकरी अनुदान वाटप याची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेतीसाठी पोकरा योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असून उत्पादनवाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT