Dharur News : निराधार योजनेत लाभार्थी निवडीवर संशय (Pudhari Photo)
बीड

Dharur News : निराधार योजनेत लाभार्थी निवडीवर संशय

धारूरमधील : ३७ नावांची चौकशी, तलाठ्यांकडून खुलासा मागविला

पुढारी वृत्तसेवा

Suspicion over beneficiary selection in the destitute scheme

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी तहसील प्रशासनाने ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना लेखी नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. बनावट आधार कार्डच्या आधारे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा धारूर शहरातील पत्त्यावर समावेश केल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे.

धारूर तालुक्यातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी निवडीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राम शेंडगे यांनी ६ जानेवारी रोजी तहसीलदार धारूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार धारूर यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना लेखी नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

तहसील प्रशासनाकडून यापूर्वी संजय गांधी योजनेत १०५ तर श्रावणबाळ योजनेत तब्बल ६०२ लाभार्थ्यांची निवड झाल्याची यादी तहसील कार्यालयाच्या फलकावर लावण्यात आली होती. मात्र, ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लाभार्थी निवड प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी दाखल होऊ लागल्या. विशेषतः ग्रामीण भागातील काही व्यक्तींनी धारूर शहरातील बनावट आधार कार्ड तयारकरून शहरातील रहिवासी असल्याचे दाखवून लाभार्थी यादीत नाव समाविष्ट केल्याचा आरोप करण्यात आला.

तक्रारींची दखल घेत तहसील प्रशासनाने संशयित ३७ लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करून ती तलाठी यांना देत त्याबाबत सविस्तर खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. खुलासा मागविल्यानंतर तहसील प्रशासनात एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे. शासनाच्या गरजूंसाठी असलेल्या योजनांचा गैरवापर थांबवण्यासाठी प्रशासन पुढील काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात ग्राम महसूल अधिकारी तलाठी मुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ३७ लाभार्थ्यांबाबत खुलासा मागविण्याचे लेखी पत्र मला तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने मी काही लाभार्थ्यांची प्राथमिक तपासणी केली असता संबंधित लाभार्थी हे धारूर शहरातील नसून ग्रामीण भागातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रकरणांमध्ये आधार कार्ड धारूर येथील रहिवासी असल्याचे बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्याचा अंदाज असल्याचे सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT