

Beed Crime News: Three people have been taken into custody in connection with the jewelry robbery case.
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा :
माजलगाव तालुक्याला हादरवून सोडलेल्या साठ लाखांच्या सोने-चांदी लूट रोडरॉबरी प्रकरणात आता धक्कादायक वळण समोर आले आहे. व्यापाऱ्याच्या दुकानातीलच कोणी परिचित व्यक्तीने ही टीप दिली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सदरील प्रकरणात बीड गुन्हे शाखेने तिघांना शुक्रवारी माजलगावातून उचलल्याची माहिती असून उर्वरित आरोपीच्या शोधासाठी व मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी माजलगाव ग्रामीण पोलिस बीडला रवाना झाले असल्याचे कळते.
माजलगाव शहरातील अमोल पंढरीनाथ गायके या सराफा व्यापाऱ्याला रविवार दि.२५ रोजी शस्त्राचा धाक धाकून त्याच्याकडील ६० लाख रुपयाचे सोने-चांदी लुटल्याची घटना घडली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या रोड रॉबरीने संपूर्ण बीड जिल्ह्यात पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगल्या गेली होती.
दरम्यान सदरील प्रकरणात बीड गुन्हे शाखेने तपासाची गती तीव्र फिरवत या गुन्ह्यातील तीन संशियत आरोपींना शुक्रवारी सकाळी माजलगावातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. एलसीबीच्या पथकाने तीन संशयितांना उचलून कसून चौकशी सुरू केली असून, त्यांच्या जबाबांवरून उर्वरित आरोपी, मध्यस्थ आणि आर्थिक दुवे उघड होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान त्या दिशेने मुद्देमाल, उर्वरित आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती पकडली आहे. प्राथमिक चौकशीत आतल्या माहितीच्या आधारेच हा गुन्हा रचल्याची शक्यता बळावली असल्याचे कळते आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीप्रमाणे, गुन्ह्याच्या वेळ, मार्ग आणि वाहतुकीची अचूक माहिती आरोपींकडे होती. व ती माहिती व्यापाऱ्याच्या नजीकच्या व्यक्तीने पुरविल्या असल्याचे कळते. त्यामुळे हा प्रकार केवळ योगायोग नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे.