Entrance Exam System : प्रवेश परीक्षा पद्धतीवर विद्यार्थी-पालकांकडून प्रश्नचिन्ह ?  pudhari photo
बीड

Entrance Exam System : प्रवेश परीक्षा पद्धतीवर विद्यार्थी-पालकांकडून प्रश्नचिन्ह ?

पेपरफुटीमुळेही वाढली नाराजी : नवीन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Students and parents question the entrance exam system?

धारूर, पुढारी वृत्तसेवा: उच्च शिक्षण आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत गेल्या काही वर्षांत प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. बारावी किंवा पदवी परीक्षेतील उत्कृष्ट गुणवत्तेला दुय्यम स्थान मिळत असल्याचा आरोपही अनेकांकडून केला जात आहे.

पूर्वी विद्यार्थ्यांना बारावी किंवा पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश मिळत होता. मात्र, आता विविध अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा बंधनकारक करण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य एका परीक्षेतील कामगिरीवर अवलंबून राहिले आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास नामांकित संस्थांमध्ये प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.

विद्यार्थी व पालकांच्या मते, केवळ एका प्रवेश परीक्षेच्या आधारे गुणवत्ता ठरविण्याऐवजी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द आणि सातत्यपूर्ण कामगिरीचाही विचार होणे आवश्यक आहे. दरम्यान, विविध प्रवेश व पात्रता परीक्षांमध्ये वेळोवेळी समोर आलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जाण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव वाढत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

टीईटी, नेट, सेट तसेच इतर प्रवेश व पात्रता परीक्षांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी आणि पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी आणि प्रवेश परीक्षेतील गुणवत्ता या तिन्ही बाबींचा संतुलित विचार करून प्रवेश प्रक्रिया राबविल्यास गुणवंत विद्यार्थ्यांना अधिक न्याय मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT