बीड; पुढारी वृत्तसेवाः
बीड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मासाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज, शुक्रवारी (दि. १९) बीड येथील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या संकेतानुसार, आज या खटल्यात आरोपींवर दोषारोप निश्चित (चार्ज फ्रेम) केले जाण्याची दाट शक्यता आहे.
या खटल्याची सुनावणी न्यायाधीश पाटवदकर यांच्यासमोर सुरू आहे. यापूर्वी १२ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत डिजिटल पुराव्यांबाबत बचाव पक्षाच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला होता, ज्यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी लवकरात लवकर घेऊन चार्ज फ्रेम करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता कराड याच्याकडून जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज न्यायालयात काय घडामोडी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.