

Girl kidnapped in Gevrai
गेवराई : गेवराई शहरातील पंचायत समिती कार्यालयाजवळील चौकातून गुरुवारी (दि.१८) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास एका कॉलेज तरुणीला चारचाकी गाडीत टाकून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी ही कॉलेजमधून सुटून पंचायत समिती जवळून जाणाऱ्या रस्त्याने शास्त्री चौकाच्या दिशेने पायी जात होती. याच दरम्यान चारचाकी गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी तिचा पाठलाग करत अचानक गाडी थांबवली व तिला बळजबरीने उचलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने जोरदार प्रतिकार करत आरडाओरडा केला. मात्र आरोपींनी तिला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत टाकले.
घटनेच्या वेळी परिसरातील काही नागरिकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी वेग वाढवत गाडी शास्त्री चौकातून पुढे राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने शहागड कडे पळवून नेली. ही संपूर्ण घटना नवरंग जनरल स्टोअर्सजवळ घडली असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ अलर्ट झाले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ यांनी तत्काळ चारचाकी गाडीचा पाठलाग सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी व गाडीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. शहरातील प्रमुख चौकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून नाकाबंदीही करण्यात आली आहे.
दिवसाढवळ्या शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस लवकरच आरोपींचा शोध घेऊन तरुणीची सुटका करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.