Santosh Deshmukh murder case
केज : मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला मंगळवारी (दि.९) एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आणि या प्रकरणातील विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
जरांगे म्हणाले की, “या खटल्याचा निकाल वर्षभर लांबणार नाही, अशी आश्वासने मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत दिली होती. आरोपींना एका वर्षात फासावर लटकवू, असेही शब्द दिले होते. मात्र आजही न्यायाची प्रक्रिया ढिम्म आहे.”
जरांगे यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “सरकारमध्ये एक आमदार आहे, त्यानेच संपूर्ण यंत्रणा हातात घेतली आहे. हे प्रकरण मुद्दाम भिजवत ठेवले जात असल्याची शंका येते,” असे ते म्हणाले.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “या प्रकरणात आम्ही देशमुख कुटुंबासोबत ठाम उभे आहोत. आरोपी तातडीने फासावर गेला नाही तर आम्हाला समाधान नाही. परळीतून काहीजण अफवा पसरवत आहेत की एक आरोपी सुटणार—परंतु हे खोटं आहे. ज्या दिवशी आरोपी सुटेल, त्या दिवशी पूर्ण जिल्हा बंद करणार आणि नंतर राज्यभर आंदोलन छेडणार. त्या दिवशी राज्यात चाकही फिरणार नाही.”
त्यांनी पुढे सरकारला सवाल केला की, “परळीतील लोक असे वक्तव्य का करतात? सरकारने हे तपासले पाहिजे. हा आरोपी सुटणार नाही, हे सत्य आहे.”
जरांगे म्हणाले, “क्रूर हत्या करणारे अजूनही मोकाट फिरत आहेत. कृष्णा आंधळे कुठे आहे? त्याने हल्ल्याचे व्हिडिओ कॉल केले आहेत. तो पकडला की प्रकरणाचा मोठा उलगडा होईल. मग सरकारला परळीतील माणूस अधिक महत्त्वाचा आहे का?”
अधिवेशनातही या प्रकरणाचा मुद्दा उठवल्याचे त्यांनी सांगितले. “चार ते पाच महिन्यांत तपास पूर्ण करावा,” अशी मागणीही त्यांनी केली. तसेच “फडणवीस साहेब, तुम्ही या प्रकरणात हात घालू नका, काहीतरी वेगळं शिजत आहे,” असा इशाराही दिला.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले,“क्रूरकर्मींनी संतोष अण्णा यांची निर्दय हत्या केली. हा दुःखद दिवस आम्ही ‘काळा दिवस’ म्हणून पाळत आहोत. कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली दिली जात आहे, पण खऱ्या अर्थाने श्रद्धांजली तेव्हाच—जेव्हा आरोपी फासावर जातील.”
ते पुढे म्हणाले की,“आरोपींना फाशी होईपर्यंत लढाई थांबणार नाही. संतोष अण्णांनी निर्माण केलेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. तपास चालू असताना बोलणे योग्य नसले तरी, न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.”