

Dhananjay Munde recalls Valmik
बीड, पुढारी वृत्तसेवा : आज एक माणूस नाही, याची जाणीव होते. त्याचे काय चुकले आहे ते न्यायालय बघेल, असे वक्तव्य आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत केले. आमदार मुंडेंना भरसभेत ज्याची उणीव भासत आहे, तो माणूस दुसरा-तिसरा कोणी नसून संतोष देशमुख हत्याकांडाचा म्होरक्या वाल्मीक कराड असल्याचा आरोप होत आहे. या वक्तव्याने धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
परळी नगरपालिका निवडणुकीकरिता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.२४) संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंडे बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या एक वर्षामध्ये माझ्या छातीवर अनेक वार झाले, अनेकांनी माझी मदत घेतली. परंतु दगाफटका केला गेला. वर्षभरात मी फार सहन केले आहे. परंतु परळीची बदनामी करणाऱ्यांना आता आपल्याला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. हे सगळे बोलत असताना आज एक माणूस या ठिकाणी नाही याची जाणीव होते. काय चुकले ते न्यायालय बघेल, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.
गतवर्षी ९ डिसेंबर रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड सध्या कारागृहात आहे. धनंजय मुंडे यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केल्याने धनंजय मुंडे यांना त्यांचीच उणीव भासत असल्याचा आरोप आता केला जात आहे. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याने बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चुकीची कामे बंद झाल्याची उणीव भासत आहे धनंजय देशमुख
आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एवढ्या दिवस जे अंग झटकत होते. या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाही, हे प्रकरण मला माहीत नाही, असे म्हणत होते पण या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे.
जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्याने जी गोष्ट बोलली गेली ती अशी आहे की, हे सगळे सहकारी चुकीचे सगळे काम करायचे, खंडणी गोळा करणे, चुकीच्या सगळ्या केसेस याची स्पष्टोकती या लोकप्रतिनिधीने दिली आहे. चुकीची कामे बंद झाल्यामुळे याची उणीव भासत आहे. पाप केले त्याला शिक्षा भेटणार आहे. एका निष्पाप माणसाला संपवले यावर जास्त चर्चा न करता एक आरोपी कसा गुंतला आहे. त्या आरोपीमध्ये कशी उणीव भासते यावरच यांचे लक्ष केंद्रित आहे, असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
वाल्मीकची आठवण काढणारा नीच माणूस : मनोज जरांगे
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्याची त्याला उणीव भासत असेल तर त्या धनंजय मुंडे इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो, जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचे समर्थन कधीच करू नये. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरे होईल. गोरगरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचे? असा थेट सवालच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी पत्रकारांशी बोलताना केला.
जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत. गुंडागर्दी, भ्रष्टाचार करणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळवून, ब्लॅकमेल करून आपला संसार उभा करणे, असे भयंकर पाप कराड करत होता. धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभे करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत, नाही तर तुम्हीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या पापात खाक व्हाल.
माझ्या हत्येच्या कटापासून धन्या तोंड लपवत आहे. मी अनेकदा नार्को टेस्टला चल म्हणून त्याला आव्हान दिले, पण तो पुढे येत नाही. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपीची उणीव भास् लागली, असे जर धनंजय मुंडे म्हणत असले तर अशा माणसाला किती दिवस सांभाळायचे? याचा विचार फडणवीस, पवारांनी केला पाहिजे. नसता त्याच्या पापात तुमचाही नाश होईल, बीडच्या जेलरचे निलंबन का केले, याची गृहमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे, असेही यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले.