Sandhya Justice Protest pudhari photo
बीड

Sandhya Justice Protest : संध्याला न्याय देण्यासाठी वडवणीत दोन तास रास्ता रोको

दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात चक्काजामचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वडवणी : १९ वर्षीय विवाहित संध्या गायकवाड (उजगरे) हिच्या प्रसूतीदरम्यान कथित वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याच्या आरोपावरून वडवणीत सोमवारी सर्वपक्षीय व आंबेडकरी विचारांच्या संघटनांच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोषी डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, संध्याच्या उपचाराचा खर्च शासनाने उचलावा आणि तिचे पुनर्वसन करावे, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला. विविध पक्षांचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संध्या गायकवाड हिच्यावर प्रसूतीदरम्यान सिझरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेदरम्यान पोटात हॅन्ड ग्लोज व कापडी रुमाल राहिल्याने तिची प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलकांनी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर चौकशीअंती फौजदारी कारवाई करावी, संध्याला ५० लाख रुपयांची मदत द्यावी आणि शासनाने तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.आंदोलनादरम्यान ‘संध्याला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘दोषी डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

‘संध्याला न्याय द्या, अन्यथा चक्काजाम’

यावेळी बाबुराव पोटभरे यांनी बीड जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदारांनी प्रकरणात तातडीने लक्ष घालून संध्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, तसेच तिचे पुनर्वसन करावे, अशीही मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास बीड जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा पोटभरे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT