Illegal sand mining pudhari photo
बीड

Illegal sand mining : राजकीय वरदहस्ताखाली वाळूमाफियांचा उच्छाद

माजलगावात खुलेआम वाळू उपसा; महसूल-पोलिस यंत्रणेचा ढिसाळपणा उघड

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील सांडू चिंचोलीसह सिंदफणा नदीपात्रात सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा म्हणजे कायदा, प्रशासन आणि पर्यावरण यांची थेट थट्टा असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केला आहे. शहरातील हॉटेल सुखसागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महसूल व पोलीस प्रशासनावर थेट बोट ठेवत राजकीय वरदहस्ताखाली गुंडांच्या टोळ्यांमार्फत वाळूचा काळाबाजार सुरू आहे असा स्फोटक दावा केला.

पोटभरे म्हणाले की, माजलगाव तालुक्यात सध्या एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वाळू घाटांचे टेंडरधारक परवानगीपेक्षा दहापट अधिक वाळूचा उपसा करत आहेत. ब्रास मर्यादेला केराची टोपली दाखवत सिंदफना नदीचे पात्र अक्षरशः पोखरले जात असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, रस्त्यांची चाळण आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

या सर्व बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी असलेले महसूल प्रशासन, विशेषतः तहसीलदार संतोष रुईकर, जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोपही पोटभरे यांनी केला. अधिक क्षमतेने वाळू वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर खुलेआम धावत असताना पोलीस कारवाई का होत नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

याआधीही या गुंडांकडून तहसीलदारास मारहाण, अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहने घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे असे गंभीर प्रकार घडले असतानाही प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी श्रीहरी मोरे, नवनाथ धाईजे, नगरसेवक सचिन जावळे, अभिजीत पोटभरे, शेख बाबा, प्रदीप पटेकर, शेख फेरोज, राहुल मस्के आदी उपस्थित होते.

बाबुराव पोटभरेंचा आंदोलनाचा इशारा

वाळू टेंडर जरी सर्वसामान्य नागरिकांच्या नावावर असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात या सर्व अवैध धंद्यामागे माजलगाव तालुक्यातील प्रभावशाली राजकीय लोकांचे अधिपत्य असून त्यांचेच गुंड हा संपूर्ण कारभार चालवत असल्याचा आरोप करत पोटभरे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला.वेळीच कठोर कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT