जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलसाठी लागल्या रांगा file photo
बीड

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलसाठी लागल्या रांगा

गेवराई, धारूर, केज, बीडसह बहुतांश तालुक्यात ओरड

पुढारी वृत्तसेवा

Queues form for petrol and diesel in the Beed district

बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल नसल्याने शनिवारी दिवसभर वाहनचालकांची तारांबळ उडाली. तर ज्या ठिकाणी पेट्रोल, डिझेल उपलब्ध होते, त्या ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळोल. गेवराई शहरासह ग्रामीण भागात इंधन टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून, शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी काही पेट्रोल पंपांवर मर्यादित प्रमाणात इंधन उपलब्ध होते; मात्र काही तासांतच साठा संपल्याने दुपारनंतर अनेक पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक लागल्याचे चित्र दिसून आले.

इंधनाच्या अभावामुळे दुचाकी व चारचाकी वाहने जागच्या जागी बंद पडत असून, अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोकरदार, व्यावसायिक तसेच शेतकरी वर्गालाही या परिस्थितीचा फटका बसत आहे.

दरम्यान, पेट्रोल पंप चालकांच्या माहितीनुसार, वितरण व्यवस्थेतील अडथळे, टैंकर वाहतुकीतील विलंब तसेच काही ठिकाणी पेमेंट प्रक्रियेत होत असलेला उशीर यामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. दरवाढीच्या शक्यतेमुळे कंपन्यांकडून आगाऊ रकमेची मागणी केली जात असल्याने लहान पंपधारक अडचणीत सापडले आहेत.

शहरातील बहुतांश पंप कोरडे पडल्याने वाहनधारक एक पंप सोडून दुसऱ्या पंपावर धाव घेत आहेत. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले, तर अनेक दुचाकीस्वारांना आपली वाहने ढकलत न्यावी लागली. सध्या सर्व पेट्रोल पंप चालक टँकरच्या प्रतीक्षेत असून, वाहतुकीतील अडथळ्यांमुळे इंधन पोहोचण्यास विलंब होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

धारूर शहरात नागरिक त्रस्त

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर शहर व परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शेतकरी, ट्रॅक्टर चालक, तसेच विविध कार्यक्रमांसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे कामकाज ठप्प झाले आहे. सध्या सुरू असलेल्या नांगरणीच्या हंगामात ट्रॅक्टरसाठी डिझेल अत्यावश्यक असते. मात्र, डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडली असून पेरणीपूर्व तयारीवर परिणाम होत आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टरसह पेट्रोल पंपांवर तासनतास रांगेत थांबत आहेत, तरीही डिझेल मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. तसेच लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम व इतर कारणांसाठी साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही डिझेल अभावी अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT