Prof. Pawar, Khatokar remanded in police custody
बीड, पुढारी वृत्तसेवा: येथील उमाकिरण शैक्षणिक संकुलात अल्पवयीन विद्यार्थीनीला क्लासेसच्या केबीनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात प्रा. विजय पवार व प्रशांत खाटोकर यांना शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. रविवारी सकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता १ जुलै पर्यंतची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.
बीड शहरातील शाहूनगर भागात असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात निटच्या तयारीसाठी शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीने प्रा. विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी तिला क्लासेस संपल्यानंतर केबीनमध्ये बोलावून घेत अश्लील चाळे केले तसेच तिचे कपडे काढायला लावून फोटो काढल्याच्या प्रकरणात तक्रार दिली होती. हा प्रकार गतवर्षी जुलै महिन्यापासून सुरु होता.
त्रास सहन न झाल्याने या विद्यार्थीनीने पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी पोलिस शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फ रार झाले होते. यातील विजय पवार याला लिंबागणेश येथून तर खाटोकर याला चौसाळा येथे अटक करण्यात आली. हे दोघे मांजरसुंबा येथे एकत्रित येणार होते. तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. यानंतर रविवारी दुपारी न्यायालयामोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आरोपींच्या पोलिस कोठडीदरम्यान या दोघांनी यापूर्वी अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का? अशा कोणत्या पिडीत विद्यार्थीनी आहेत का? या चा तपास केला जाणार आहे. याबरोबरच पिडीत अल्पवयीन विद्यार्थीनीचे अश्लील छायाचित्र या प्राध्यापकाने काढल्याचे समोर आले होते, तो मोबाईल देखील जप्त करुन त्याची तपासणी केली जाणार आहे तसेच इतर महत्त्वपूर्ण बाबींचा तपास या दोन दिवसांत केला जाणार आहे.