माजलगाव : कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबड कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन करावं लागतं. हे आमच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे, असे वक्तव्य आ.प्रकाश सोळंके यांनी मंगळवारी (दि.२८) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत केले. त्यांचे हे वक्तव्य त्यांच्या आंगलट येण्याची शक्यता असून त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणूक जिंकण्यासाठीचा वेगळाच पॅटर्न कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितला. विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात दारुगोळा कशा पद्धतीने लागतो. हे आमच्या कार्यकर्त्यांना माहित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडा कापावा लागतो, कोणाला बकरे कापावे लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, हे तुम्हा कार्यकर्त्यांना चांगलंच माहित आहे. माझ्या अनेक निवडणुका तुम्ही लढल्या आहेत. आता या निवडणुकीत देखील आपल्याला हे करावं लागणार आहे, असेही म्हणाले. आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणूक जिंकण्याचा हा कानमंत्र राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना भर जाहीर बैठकीत दिला. दरम्यान हा कानमंत्र देतानाचा नेमका व्हिडिओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे.
माजलगावमध्ये झालेल्या आढावा बैठकीत प्रकाश सोळंके बोलत होते. यावेळी आमदार विजयसिंह पंडित व जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून यावरून जोरदार टीका देखील होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील बैठकीत सादर झालेल्या लावणीचा व्हिडिओ चर्चेत असताना आता राष्ट्रवादीच्या आमदाराचा हा निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र आता अजूनच चर्चेचा विषय ठरत आहे.