

Ajit Pawar NCP Nagpur Office Lavani
नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात लावणीचे सादरीकरण झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात रविवारी (दि २६) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपुरातील मुख्य कार्यालय गणेश पेठ परिसरात असून अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच अजित पवार यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले होते. या कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नृत्यांचाही कार्यक्रम पार पडला. सोहळ्यादरम्यान ‘वाजले की बारा’, ‘मला इश्काच्या झुल्यात झुलवा’ या लावण्या सादर करण्यात आल्या. नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी नृत्य सादर केले. या लावणीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रतिसाद दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पक्षाच्या कार्यालयात अशा प्रकारे लावणीचे सादरीकरण झाल्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर स्थानिक नेत्यांनी प्रतिक्रिया देताना शिल्पा शाहीर या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याचा दावा केला आहे.
पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीने नव्या,जुन्याचा समावेश असलेली कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. एकीकडे पक्ष वाढीसाठी प्रयत्न आणि महायुतीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असताना अजित दादांच्या राष्ट्रवादीला यानिमित्ताने बॅक फुटवर जावे लागण्याची शक्यता आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या नागपूर महापालिकेत राष्ट्रवादीच्या किंवा शिंदे सेनेच्या वाट्याला फार काही जागा येण्याची शक्यता नाही. यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमानिमित्त सादर करण्यात आलेल्या शिल्पा शाहीर यांच्या वाजले की बारा...लावणीची पक्षश्रेष्ठी कशी दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहींच्या मते त्या पक्षात कार्यकर्ता आहेत तर काहींच्या मते त्यांना सत्कार निमित्ताने बोलावण्यात आले होते. लावणी कलावंत असल्याने त्यांनीही सादरीकरण केले.
यावेळी शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला अध्यक्ष सुनीता येरणे यांनीही यात चुकीचे काहीच नाही. मात्र, खासदार सुनेत्रा पवार यांनी याबाबत अध्यक्षांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या मते यात काहीच गैर नाही. पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांमधील कला गुणांना या कौटुंबिक दिवाळी मिलन निमित्ताने प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम होता. अनेकांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले. यातच ही लावणी देखील सादर झाली. बघण्याची दृष्टी कशी ते महत्वाचे आहे असे स्पष्ट केले.