अंबाजोगाई : शहरात वाहनांची संख्या वाढल्याने ध्वनिप्रदूषणचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कर्ककर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे शहरातील लोक हैरान झाले आहेत. यामुळे पोलिसांनी गुरूवारी (दि.१७) मोहिम राबवत बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेत ३० बुलेटचे सायलेन्सर काढून पोलिसांनी त्यावर बुलडोझर फिरविला.
सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे वृत्तपत्रातून आवाज उठविण्यात आला होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अंबाजोगाईत पोलिसांची बैठक घेतली. अंबाजोगाई येथील वाहतूक शाखेच्या पथकाला कर्कश आवाज करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या . त्या सूचनेनुसार पोलिसांनी बुलेटस्वारांचे सायलेन्सर जप्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायलेन्सरवर बुलडोजर फिरविला. पोलिसांच्या कारवाईमुळे वाहनधारकांना चांगलाच चाप बसणार आहे. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडको यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पीआय कांबळे, वाहतूक पोलीस मधुकर रोडे, पी डी फड, बाळासाहेब पारवे, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत चादर,दत्ता इंगळे, कृष्णा वडकर यांनी केली.