

बीड : ऊसतोड मुकादमाने बाराशे रुपयांच्या कारणावरून शेतगडीचे अपहरण केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी बेदम व अमानुष मारहाण केली. ही घटना शुक्रवार, ११ जुलै रोजी माजलगाव तालुक्यातील लऊळ शिवारात घडली असून सिरसट हे सध्या बीड जिल्हा रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किट्टीआडगाव येथील शेतकरी व माजी पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांच्याकडे काम करणाऱ्या शेतगडी विश्वनाथ पंडित याचे बाराशे रुपये शेख राजू शेख बाबू (रा. मंजरथ) या मुकादमाकडे देणे होते. या वादातून मुकादम व त्याच्या साथीदारांनी पंडित याचे अपहरण केले व त्याला मारहाण सुरू केली. त्यावेळी पंडित याने सिरसट यांना फोन करून मदतीची विनंती केली.
राजाराम सिरसट यांनी दीड लाख रुपये घेऊन मुकादमाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यावरही, शेतगडीने पैसे देऊ नका असे सांगितल्यामुळे मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ व मारहाण केली. झाडीत लपून बसलेल्या १०-१२ जणांनी लाठ्या-काठ्या व धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. मुकादमाने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पुन्हा मारहाण केली. रिव्हॉल्वरमध्ये बुलेट नसल्याचे लक्षात येताच त्यांनी हसत बेदम मारहाण सुरूच ठेवली.
सिरसट यांना जंगलात घेऊन जाऊन पुन्हा दीड लाख रुपये हिसकावले. त्यांना पाणी मागितल्यावर तोंडावर लघुशंका करण्यात आली. या प्रकाराने अमानुषतेचा कळस गाठला. दरम्यान, त्यांचा शेतगडी पळून जाऊन त्यांच्या मुलाला कळवून गाठ घालण्यास सांगितले. वेळेत पोहोचलेल्या विजयकुमार सिरसट व त्यांच्या मित्रांच्या मदतीने गुंड पळून गेले. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
या मारहाणीत राजाराम सिरसट यांना गंभीर इजा झाली. पाण्याची विनंती करताच मारेकऱ्यांनी त्यांच्या तोंडावर पाण्या ऐवजी लघुशंका केली. एवढे अमानुषपणे कृत्य मारेकऱ्यांनी करून क्रौर्याची परिसीमा गाठली.