Playing with the lives of students while crossing the state highway.
टाकरवण, पुढारी वृत्तसेवा
माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण देणारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असून, या शाळेत दररोज टाकरवण व परिसरातील सुमारे एक हजार विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, शाळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना राज्यमार्ग ओलांडावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेजवळील चौक हा नेहमीच नागरिक व वाहनांच्या मोठ्या वर्दळीचा ठिकाण आहे. रस्ता चांगल्या स्थितीत असल्याने अनेक वाहनचालक येथे सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याचे चित्र दिसून येते. परिणामी, या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असून, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना दिवसातून किमान दोन वेळा हा राज्यमार्ग ओलांडावा लागत असल्याने पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. चौकाच्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहनांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण राहत नाही, ही बाब अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर चौकात दर्जेदार गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी पालक वर्गाकडून जोर धरत आहे. मात्र, संबंधित राज्यमार्ग विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या विषयासंदर्भात शाळेच्या वतीने ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनही देण्यात आले आहे, तरीदेखील अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, अपघातांची मालिका सुरूच असून, पालकांची चिंता अधिकच वाढली आहे.