MLA Rohit Pawar : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार द्या; अन्यथा समृद्धी मार्ग रोखू file photo
बीड

MLA Rohit Pawar : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार द्या; अन्यथा समृद्धी मार्ग रोखू

आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारला इशारा; बीडमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

Pay farmers ₹50,000 per hectare; otherwise, we will block the Samruddhi Mahamarg

बीड, पुढारी वृत्तसेवा: पावसाने ओढ दिल्याने बीड जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केली. शासनाने 15 दिवसांत मदतीचा निर्णय घेतला नाही, तर ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शेतकरी जनआक्रोश मोर्चानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून मोर्चाला सुरुवात झाली. आमदार रोहित पवार बैलगाडीतून मोर्चात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार सय्यद सलीम, राजेसाहेब देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके करपली आहेत. आपण प्रत्यक्ष शेतांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहिली असून, सरकारला वस्तुस्थिती सांगितली आहे. अतिवृष्टी किंवा पावसाच्या नुकसानीनंतर मोठमोठे मदतीचे आकडे जाहीर केले जातात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर अपेक्षित रक्कम जमा होत नसल्याच्या तक्रारी आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सरकारकडून मदतीबाबत करण्यात आलेल्या घोषणांचा संदर्भ देत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्याची मागणी केली. पीक विमा कंपन्यांच्या अहवालावरच अवलंबून न राहता प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची भूमिका सरकारने मांडली असल्याचा उल्लेख करीत रोहित पवार यांनी प्रत्यक्ष मदतही सरसकटच मिळावी, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आणि शेतमजुरांना 25 हजार रुपये मदत द्यावी, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अशाच मागण्या आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यांनी पाहणीदरम्यानही मांडल्या आहेत. यापूर्वी बीडमध्ये सुरू झालेला शेतकऱ्यांचा आक्रोश राज्यभर नेणार असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पंचनामे आणि मदतीबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करून त्यानंतर केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची भूमिका सरकारने मांडली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याची मागणी

बीडच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही दुष्काळी भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. केवळ दौरे करून न थांबता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चादरम्यान एका शेतकऱ्याने कर्जफेडीसाठी बँकेकडून आलेली नोटीस रोहित पवार यांना दाखवली. पीक हातातून गेल्यानंतर उत्पन्नाचा स्रोत नसताना कर्जफेडीचा तगादा सुरू असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत आणि कर्जाच्या प्रश्नावर दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत पिकांचे नुकसान, पीकविमा, कर्जवसुली, चारा-पाणी आणि शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनत असल्याने शासनाने पंचनामे व मदतीच्या प्रक्रियेला वेग द्यावा, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली.

भाजपने अर्थमंत्रीपद परत दिलं नाही

दुष्काळी मोर्चासाठी बीडच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार रोहित पवार यांनी अर्थमंत्री पदावरून आता भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की, भाजपा फसवा आहे हे आधीपासून आम्ही सांगितलं त्यामुळेच आम्ही भाजपासोबत गेलो नाहीत. कदाचित त्यांना ते कळलं नसेल परंतु आता कळलं. दादांनी त्यामुळेच अर्थमंत्री पद स्वतःकडे ठेवलं होतं. परंतु ते गेले की भाजपाने अर्थमंत्री पद स्वतःकडे घेतले. अद्यापही दिलेलं नाही. आणि राष्ट्रवादीला ते परत मागताही येत नसेल तर कुठेतरी त्यांनी स्वाभिमान साईडला ठेवलाय असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे

मोर्चात बैलगाडी, परत जाताना हेलिकॉप्टर

बीडमध्ये दुष्काळ प्रश्नावर आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाकरता आमदार रोहित पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडीतून आले होते. मोर्चामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. परंतु बीडमधून जाताना मात्र ते चक्क हेलिकॉप्टरने गेल्याने याची बीडमध्ये चर्चा होत आहे. एकीकडे सत्ताधारी आमदार खासदारांच्या बैठकीत आलेले काजू, बदाम, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील मेटल डिटेक्टर चर्चेत असताना आता रोहित पवारांचा हेलिकॉप्टर दौरा देखील चर्चेत आलांय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT