चोवीस तासांत पाटोदा खून प्रकरण उघडकीस ! pudhari photo
बीड

Patoda murder case : चोवीस तासांत पाटोदा खून प्रकरण उघडकीस !

हातउसने घेतलेल्या पैशाच्या तगाद्यातून खून; आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

बीड : पाटोदा तालुक्यातील दगडवाडी शिवारात बीड-शिरूर (का) रस्त्यालगत घडलेल्या थरारक खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. डोक्यात दगड घालून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अतिक गुलाब तांबोळी (रा. इस्लामपुरा पेठ, बीड) याला अटक करण्यात आली आहे. हातउसने घेतलेल्या पैशाच्या तगाद्यातून हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 ते 2 फेब्रुवारी सकाळी 8 वाजेदरम्यान, पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील दगडवाडी गावच्या शिवारात बीड-शिरूर (का) रस्त्याच्या डाव्या बाजूस चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय 30, व्यवसाय - पेंटिंग काम, रा. रायमोहा, ता. शिरूर (का), जि. बीड) याचा डोक्यात दगड मारून खून करण्यात आला होता.

या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 30/2026 अन्वये कलम 103 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीने केल्याने तपास पोलीसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. मात्र पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गोपनीय बातमीदार, तांत्रिक विलेषण आणि शास्त्रीय तपासाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला.

तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, अतिक गुलाब तांबोळी यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शासकीय रुग्णालय परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी पोलिसांना उडवा-उडवीची उत्तरे देत होता. मात्र अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने मृत चाँद तांबोळी याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. पैसे परत मिळावेत म्हणून चाँद तांबोळी वारंवार तगादा लावत होता. या रागातूनच आरोपी अतिक तांबोळी याने चाँद तांबोळी याच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केली.आरोपी अतिक गुलाब तांबोळी याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे पाटोदा यांच्या ताब्यात देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT