Parli Shravan Mahotsav File Photo
बीड

Parli Shravan Mahotsav: परळीत शासनाचा ‘श्रावण महोत्सव’ रसिकांविनाच; दर्जेदार कार्यक्रमाचा प्रसिद्धीअभावी फज्जा!

शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेला ‘श्रावण महोत्सव’ अपेक्षित रसिकांशिवाय पार पडल्याने कार्यक्रमाच्या नियोजनासह प्रसिद्धी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Parli Shravan Mahotsav

परळी वैजनाथ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेला ‘श्रावण महोत्सव’ अपेक्षित रसिकांशिवाय पार पडल्याने शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनासह प्रसिद्धी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भक्तिसंगीताचा सुरेल आविष्कार आणि गुणी कलाकारांचा सहभाग असतानाही कार्यक्रमाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचवण्यात अपयश आल्याने दर्जेदार कार्यक्रमाचा अपेक्षित परिणाम साधता आला नल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

‘श्रावण महोत्सवा’अंतर्गत ‘स्वरविहार’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. राजेश सरकटे यांच्यासह विविध कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र, कार्यक्रमाची व्यापक पूर्वप्रसिद्धी झाली नसल्याचे जाणवले. शहरातील अनेक नागरिक, रसिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाच कार्यक्रमाची माहिती नसल्याची स्थिती होती.

कार्यक्रम उत्तम; मात्र प्रेक्षक कुठे?

शासकीय पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हीदेखील नियोजनाची महत्त्वाची बाब असते. स्थानिक माध्यमे, सोशल मीडिया, प्रमुख चौक, मंदिर परिसर, शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक संघटनांच्या माध्यमातून प्रभावी प्रसिद्धी केली असती, तर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती लाभली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कलाकारांनी कला सादर केली; जनतेपर्यंत निमंत्रण पोहोचले का?

कार्यक्रमाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याबद्दल सहभागी कलाकारांना दोष देणे योग्य ठरणार नाही. कलाकारांनी आपली कला सादर करण्याचे कर्तव्य बजावले; मात्र ती ऐकण्यासाठी रसिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आयोजक आणि संबंधित यंत्रणेची होती. आयोजन चांगले असतानाही प्रसिद्धी आणि जनसंपर्काचा अभाव राहिला, तर शासनाचा मूळ उद्देशच निष्फळ ठरतो.

शासकीय कार्यक्रम ‘उरकायचा’ की जनतेपर्यंत पोहोचवायचा?

जनतेच्या करांतून होणाऱ्या खर्चातून आयोजित होणारा सांस्कृतिक कार्यक्रम केवळ कागदोपत्री पूर्तता किंवा औपचारिक सोपस्कार म्हणून न पाहता त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे अपेक्षित आहे. त्यासाठी आयोजक, स्थानिक प्रशासन, सांस्कृतिक विभाग आणि जनसंपर्क यंत्रणा यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे. परळीतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्धी किती करण्यात आली? स्थानिक माध्यमे आणि सांस्कृतिक संस्थांना माहिती देण्यात आली होती का? अपेक्षित आणि प्रत्यक्ष उपस्थिती किती होती? संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय होता का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीला निश्चितच गरज आहे. मात्र, दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून सभागृहात पार पाडणे पुरेसे नाही; तो रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन आणि प्रभावी जनसंपर्कही तितकाच आवश्यक आहे. अन्यथा खर्च होईल, कलाकार येतील; पण खुर्च्या मात्र रसिकांची वाट पाहतच राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT