Parli Vaijnath | परळी वैजनाथ: वैद्यनाथ मंदिरात अखेरच्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी

कालपासून आजदुपारपर्यंत सुमारे दीड लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतल्याची नोंद
 Vaijnath Temple Devotees  Crowds
Vaijnath Temple Devotees CrowdsPudhari
Published on
Updated on

Vaijnath Temple Devotees Crowds

परळी वैजनाथ: चालू वर्षातील अखेरच्या श्रावण सोमवारनिमित्त प्रभु वैद्यनाथ मंदिरात देशभरातून शिवभक्तांचा महापूर ओसंडून वाहिला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रविवार मध्यरात्रीपासूनच भाविकांनी लांब रांगा लावल्या होत्या. कालपासून आजदुपारपर्यंत सुमारे दीड लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे.

श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने परळीत सकाळ पासूनच मंदिर परिसर शिवभक्तांच्या गर्दीने आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने गजबजून गेला होता. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता रविवार मध्यरात्री नंतरच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतील भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

 Vaijnath Temple Devotees  Crowds
Beed Crime News : अंबाजोगाईत मिनी गंठण चोरीचा तीन दिवसांत छडा; १.५४ लाखांचा ऐवज हस्तगत

आकर्षक रोषणाई आणि महाप्रसाद वाटप

दर सोमवारप्रमाणे याही अंतिम सोमवारी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यनाथ मंदिराला अत्यंत आकर्षक अशी पुष्पसजावट आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुवर्णनगरीसारखा उजळून निघाला होता. तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी नाथ प्रतिष्ठानकडून अखंड उपवास महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

चोख बंदोबस्त आणि मनोभावे प्रार्थना

गर्दीचे योग्य नियमन व्हावे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून मंदिर व परिसरात ३०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, यंदा जाणवत असलेली दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी, वरुणराजाने कृपा करावी आणि बळीराजा सुखी व्हावा, अशी मनोमन प्रार्थना यावेळी उपस्थित लाखो शिवभक्तांनी वैद्यनाथ प्रभूच्या चरणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news