परळी : तालुक्यातील सेलू येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महावितरणच्या लोंबणाऱ्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चाऱ्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीत ट्रकमधील संपूर्ण कडबा जळून खाक झाला असून, पशुपालक शेतकरी विलास राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, वेळीच अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विलास राठोड हे आपल्या ट्रकमधून जनावरांसाठी कडबा घेऊन जात होते. सेलू परिसरातून जात असताना रस्त्यावरील महावितरणच्या विद्युत तारा खाली लोमकळत होत्या. या तारांचा स्पर्श ट्रकला झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. सध्या परळी परिसरात तापमान 42 अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने उष्णतेमुळे ही आग वेगाने पसरली.
सेलू येथील बाळू फड प्रसंगावधान राखून परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला.औष्णिक केंद्राचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, ज्यामुळे ट्रकचे पुढील नुकसान आणि इतर संभाव्य धोका टळला.
नुकसान भरपाईची मागणी
दरम्यान,या आगीत वर्षभराचा साठवलेला जनावरांचा चारा जळून खाक झाल्याने विलास राठोड यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.