Newspaper Vendor Attacked Parli
परळी वैजनाथ : जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजाऱ्याने थेट घरात घुसून धारदार वस्ताऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना परळी शहरातील कंडक्टर कॉलनीत घडली आहे. या हल्ल्यात वृत्तपत्र विक्रेते उद्धव विनायकराव हाडबे (वय ३९) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डाव्या कानावर व गालावर गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत उद्धव हाडबे यांनी नमूद केले आहे की, ते पत्नी व दोन मुलांसह कंडक्टर कॉलनीतील रामराव तारडे यांच्या घरी भाड्याने वास्तव्यास असून वृत्तपत्र एजंट म्हणून काम करतात. दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री त्यांच्या पत्नी राजश्री या घरी एकट्या असताना शेजारी राहणारे सुनिल राऊत व त्याची पत्नी रुपाली राऊत यांच्यात वाद झाला होता.
या वादाची तक्रार देण्यासाठी दोघे पोलीस ठाण्यात आले असता राजश्री यांची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात पाठवले होते. त्यानंतर कौटुंबिक कारणामुळे ते पुण्याला गेले होते.दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पुण्याहून परतल्यानंतर उद्धव हाडबे आपल्या कामासाठी बाहेर गेले होते.
सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास, ते घरी झोपले असताना, शेजारी राहणारा सुनिल राऊत अचानक त्यांच्या घरात घुसला. त्याच्या हातात दाढी करण्याचा धारदार वस्तारा होता. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याने उद्धव हाडबे यांच्या डाव्या कानावर व डाव्या गालावर वार करून गंभीर दुखापत केली. मोठ्याने आरडाओरड केल्यावर घरमालक रामराव तारडे व परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.
याच वेळी आरोपीची पत्नी रुपाली राऊत हिनेही घरात बेकायदेशीर प्रवेश करून उद्धव हाडबे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जमलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करून हाडबे यांची सुटका केली.जखमा गंभीर व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणी सुनिल राऊत व रुपाली राऊत यांच्याविरुद्ध बेकायदेशीर घरात प्रवेश, धारदार शस्त्राने मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास संभाजीनगर पोलीस करीत आहेत.