

परळी : परळी वैजनाथ येथील पोलीस ठाणे संभाजीनगर हद्दीत बेकायदेशीर दारूसाठवणूक व विक्रीप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे परळी नगर परिषदेच्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार उर्वरित तीन प्रभागांतील मतदानाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8.45 वाजता परळी वैजनाथ येथील हॉटेल आबासाहेब समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी बेकायदेशीररीत्या विविध कंपन्यांची दारू साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संदीप उत्तमराव चव्हाण यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली.
या छाप्यात रॉयल स्टॅग, मॅकडॉल, ओल्ड बॉम्बे, इम्पेरियल ब्ल्यू, आयकॉनिक व्हाइट, आफ्टर डार्क ब्ल्यू, सखु संत्रा, टँगो पंच, रुस्तुम गोल्ड, मॅजिक मोमेंट्स आदी विविध कंपन्यांच्या दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे दीड लाख रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस ठाणे संभाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 259/2025 अन्वये दि. 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.34 वाजता ईश्वर रेशमाजी बहीरे (वय 35, रा. कन्हेरवाडी, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. निवडणूक काळात अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून केलेली ही कारवाई नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.