Beed News : पाच बळी गेल्यानंतर अखेर कारवाई file photo
बीड

Beed News : पाच बळी गेल्यानंतर अखेर कारवाई

डीबीएल कंत्राटदारासह अभियंत्यावर गुन्हा; महामार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

Offense against engineer with DBL contractor; The issue of highway safety is on the agenda

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : खामगाव-पंढरपूर महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर महामार्गाच्या कामाशी संबंधित जबाबदार व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन लिमिटेड (DBL) कंपनीच्या कंत्राटदारासह संबंधित इंजिनिअरविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महामार्गाच्या कामाची गुणवत्ता, वाहतूक सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि संभाव्य निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माजलगाव येथील भाविक तुळजापूरच्या दर्शनासाठी कारने जात असताना शिंदेवाडी फाट्याजवळ त्यांच्या कारची एसटी बसशी समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाच घटनेत पाच जणांचा बळी गेल्याने माजलगाव तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली.

अपघातानंतर मृतांच्या नातेवाइकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत महामार्गाच्या कामाशी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिकाही नातेवाइकांनी घेतल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले होते.

खामगाव-पंढरपूर महामार्गावरील शिंदेवाडी फाट्यावरील या अपघातामुळे रस्त्याची रचना, कामाचा दर्जा, दिशादर्शक फलक, वाहतूक नियंत्रण आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी होत्या का, अपघात टाळण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती का आणि संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाच जणांचा जीव गेल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ गुन्हा दाखल करण्यापुरती कारवाई मर्यादित न राहता अपघाताची कारणे निश्चित करून महामार्गावरील धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जातात का, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी जबाबदारी निश्चित करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तपासातून जबाबदारी स्पष्ट होणार

या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित कंत्राटदार आणि इंजिनिअरविरोधात गुन्हा दाखल केला. उपलब्ध माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १०६ (१) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महामार्गाच्या कामाशी संबंधित जबाबदारी आणि निष्काळजीपणाच्या शक्यतेच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अपघाताची नेमकी कारणे आणि संबंधितांची जबाबदारी तपासातून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT