

Wastage is a cause for concern; millions of litres of water lost due to valve leakage
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर शहराला कुंडलिका धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने पाइपलाइनचे काम सुरू आहे. एका पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, आरणवाडी गावाजवळ पाइपलाइनवरील व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. एकीकडे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नगरपरिषदेच्या पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पाइपलाइनमधील गळती तातडीने थांबवून उपलब्ध पाण्याची बचत करणे आवश्यक असताना संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना त्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे, तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे ही संबंधित अभियंते व प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
धारूर नगरपरिषदेत प्रभारी मुख्याधिकारी असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जात आहे. पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेबाबत नियोजनाचा अभाव असेल, तर त्याचा थेट फटका शहरातील नागरिकांना बसतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पाइपलाइनमधील गळतीची कारणे शोधावीत. संबंधित अभियंते, कंत्राटदार आणि प्रशासनाच्या कामकाजाची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
धरणांतील पाणीसाठा कमी
कुंडलिका धरणात सुमारे 17 टक्के, तर धनेगाव धरणात आठ ते नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना प्रत्येक थेंब जपणे गरजेचे आहे. शहरात नियमित पाणीपुरवठ्याची अपेक्षा असताना पाइपलाइनमधून होणारी गळती ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने गळती बंद करून पाण्याची नासाडी थांबवावी आणि शहरासाठी प्रभावी पाणीपुरवठा नियोजन करावे, अशी मागणी धारूरकरांकडून होत आहे.
कामाच्या दर्जाची चौकशी करा
नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पाइपलाइनवरील व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती नेमकी कशामुळे होत आहे, तांत्रिक त्रुटी आहेत का आणि कामाच्या दर्जात काही कमतरता राहिली आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. संबंधित अभियंते, कंत्राटदार आणि नगरपरिषद प्रशासन यांच्यात समन्वय आहे का, याचाही आढावा घेण्याची गरज व्यक्त होत आहे. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करावी आणि गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.