इरण्णाच्या मोबाईलमध्ये पैशाची देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे NEET EXAM
बीड

NEET : इरण्णाच्या मोबाईलमध्ये पैशाची देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे

पुढारी वृत्तसेवा

लातूर : पुढारी वृतसेवा : नीट चाचणी घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगलवार आणि इतर दोन आरोपींच्या सहा मोबाईलमध्ये नीटच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट, विद्यार्थ्यांशी त्यांनी परी क्षेतील गैरव्यवहाराविषयी केलेले चॅटिंग आणि आर्थिक देवाण-घेवाणीचीही माहिती एटीएसला आढळली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री अटक करण्यात आलेला शिक्षक संजय जाधव याला मंगळवारी न्यायालयाने २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पैशाच्या मोबदल्यात काम

आयटीआयमधील शिक्षक इरण्णा, जि.प. शाळेचा मुख्याध्यापक जलील उमरखां जलील आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. पैशाच्या मोबदल्यात ते काम करीत होते. संजय जाधव हा इच्छुक विद्यार्थी आणि त्यांचे पालक हेरायचा, त्यांच्याकडून पैसे घेऊन तो इरन्ना कोनगलवारकडे पाठवायचा असे त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या ६ मोबाईलमधून स्पष्ट झाल्याचे सांगितले जाते.

एटीएसकडून गुप्त पद्धतीने तपास

या प्रकरणाचा तपासही एटीएसकडून अत्यंत गुप्त पद्धतीने केला जात असल्यामुळे अधिकृत माहिती देण्यास स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी असमर्थता व्यक्त केली. इरण्णाच्या घरझडतीत आढळलेल्या मोबाईलमध्ये पैशाचे व्यवहार झाल्याचे चॅटिंग आढळल्यामुळे या घोटाळ्याचे गांभीर्य वाढले आहे. ज्या विद्यार्थी आणि पालकांशी या त्रिकुटाने आर्थिक व्यवहार केले, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

व्यवसायाने शिक्षक असलेला नीट पेपरफुटी प्रकरणातील फरार आरोपी संजय तुकाराम जाधव (रा. लातूर) याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. २४) रोजी रात्री उशीरा अटक केली होती. मंगळवारी (दि. २६) त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी एन.एन. चव्हाण यांनी त्याला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

नीट गैरव्यवहार

नीट गैरव्यवहारात सहभाग असल्याच्या संशयावरून नांदेड एटीएस पथकाने २२ जून रोजी जलील उमरखा पठाण व संजय जाधव यांची चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून दिले होते. तथापि गरज भासल्यास बोलावले जाईल त्यामुळे तुम्ही कोठेही जाऊ नका, असे पोलिसांनी त्यांना बजावले होते.

संजय जाधव फरार

दरम्यान, जलील उमरखां पठाण याला २३ जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो पोलिस कोठडीत आहे, परंतु, संजय जाधव फरार होता. नीट प्रकरणात संजय जाधव याचा संबध असून या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी व या प्रकरणाचे अन्य धागेदोरे, सहभागी, संशयित याच्यांपर्यंत पोहचण्यासाठी आरोपी संजय जाधवला दहा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी असा युक्तीवाद सरकारी अभियोक्ता अॅड. रागिणी चव्हाण यांनी केला. त्यावर न्या. चव्हाण यांनी आरोपी संजय जाधव यास दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

इरण्णालाही चौकशी करून सोडले?

एटीएसने जलील उमरखां, संजय जाधव आणि इरण्णा कोनगलवार यांना प्राथमिक चौकशीसाठी बोलावले आणि राहते गाव सोडू नका, असे बजावून त्यांना सोडून दिले होते. त्यापैकी पठाणला लगेचच अटक करण्यात आली, पण जाधव आणि इरण्णा फरार झाले. जाधवला अटक करण्यात एटीएसला यश आले, परंतु इरण्णा अजूनही फरार आहे. त्याला त्याचवेळी अटक केली असती किंवा त्याच्यावर नजर ठेवली असती, तर त्याला फरार होण्याची संधीच मिळाली नसती, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT