डॉ. क्षीरसागरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी File Photo
बीड

डॉ. क्षीरसागरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

भाजपात प्रवेश करत लढवणार नगरपालिका निवडणूक; बीडमधील समीकरण बदलले

पुढारी वृत्तसेवा

NCP chief Dr. Yogesh Kshirsagar resigned from his post and party membership.

बीड, पुढारी वृत्तसेवा बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाच्या कार्यालयात ई मेलद्वारे हा राजीनामा पाठवण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे ते भाजपात प्रवेश करत नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याने बीडच्या निवडणुकीचे समीकरणच बदलले आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याचे कारण डॉ. क्षीरसागर यांनी राजीनाम्यामध्ये दिले आहे.

बीड नगरपालिका निवडणूकीदरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी झाल्याने डॉ. योगेश क्षीरसागर यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. काही वर्षांपूर्वी एक गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडला होता. त्यामध्ये अमर नाईकवाडे, फारुक पटेल यांच्यासह इतर काहींचा समावेश होता. त्याच गटाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आ.धनंजय मुंडे व माजी आ.अमरसिंह पंडित हेच आमचे नेते असल्याचे जाहीर केले होते. त्याच गटाच्या कारणावरुन आता डॉ. योगेश क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची वेळ आली.

गेल्या काही दिवसांपासून बीड नगरपालिका निवडणूकीचे उमेदवार ठरवण्यासाठी पक्षीय पातळीवर बैठकांचे सत्र सुरु होते. या मध्ये डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहत होते. परंतु अंतिम उमेदवार ठरवतांना डॉ. योगेश क्षीरसागर एकीकडे व उर्वरित पदाधिकारी एकीकडे असा पेच निर्माण झाला. कोणत्या गटाचे किती उमेदवार द्यायचे, यावर एकमत होत नव्हते. याबाबत जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनीही मधस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मार्ग निघू शकला नाही. यामुळे शुक्रवारपासूनच राष्ट्रबादी काँग्रेसच्या बैठका शिवछत्र या आ. विजयसिंह पंडित यांच्या निवासस्थानी होऊ लागल्या. या दरम्यान डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही थेट भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आता भाजपात प्रवेश करुन त्याच माध्यमातून निवडणूका लढवण्याचे त्यांनी निश्चित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे पाठवला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून यातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित कशा पद्धतीने डावपेच आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर बदलले चित्र

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय घेताना स्थानिक पातळीवर डावलले जात असल्याने डॉ. योगेश क्षीरसागर नाराज होते. या दरम्यानच त्यांनी बीडमध्ये तसेच परळी येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. यामुळे बीडच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत होते. अखेर याबाबतचा निर्णय झाल्याचे समोर आले असून एकदोन दिवसात डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरू शकतो.

जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे लक्ष

नगरपालिका निवडणूकीची धामधूम सुरू असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे मात्र यामध्ये कुठेही सक्रिय झाल्याचे दिसलेले नाही. आता पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलेला असून ते आता काय भूमिका घेतात? पुतण्याला मदत करतात की अन्य काही निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT