नरेंद्र येरावार
उमरी: काय करावं देवा. कुणाला सांगावं. जो तो येतो फोटो काढतो. मात्र मदत कोणीच देत नाही. "आभाळ फाटलं.... पिकांचा चिखल झाला, अन् शेतकऱ्यांचा घास रानातच हरपला" अशी बिकट अवस्था कृषीप्रधान असलेल्या देशातील शेतकऱ्यांची झाली आहे.
उमरी शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवारी (दि.२६) संततधार आणि शनिवारी (दि.२७) मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचले. हाताला आलेले मूग गेले.. उडीद गेले.. सोयाबीन गेले..कापूस गेला..काही ठिकाणच्या जमिनीही वाहून गेल्या.
गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांची दैना झाली. महागाईचे बियाणे शेतात टाकले. रसायनिक खते टाकली. यंदा उत्पन्न वाढेल. चार पैसे हातात येतील. अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा निराशा आली. काय करावे कळत नाही देव कोपला. पिके गेली. अनेकांची जनावरे वाहून गेली. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या बळीराजाला शासकीय मदतीची गरज आहे. शंभर टक्के पिक विमा मंजूर व्हावा, संपूर्ण कर्जमाफी व्हावी. यासाठी शासन दरबारी सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने कहरच केला आणि शेतातील सर्वच वाहून नेले. शनिवारी (दि.२७ सप्टें) देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. गोदावरी नदीला महापूर आला. ग्रामीण भागात जाणाऱ्या अब्दुलापूरवाडी, हातनी, बेलदरा, येंडाळा, महाटी, कौडगाव, कुदळा, बोळसा, ईज्जतगाव जाणाऱ्या रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दिवसभरासाठी वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे अनेकांनी उमरी शहरात येण्याऐवजी घरातच बसणे पसंद केले. शनिवारी सकाळपासून सूर्यदर्शन झालेलेच नाही.