Beed News : बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपमध्ये हालचालीना वेग; डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या नावाची चर्चा File photo
बीड

Beed News : बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपमध्ये हालचालीना वेग; डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या नावाची चर्चा

पक्षाकडून काही प्रमुख नावांची शिफारस केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

पुढारी वृत्तसेवा

Movement in BJP accelerates for Beed-Latur-Dharashiv local body constituency; Dr. Omprakash Shete's Name Under Discussion

माजलगाव : पुढारी वृत्तसेवा

बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाकडून काही प्रमुख नावांची शिफारस केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये माजी मंत्री बसवराज पाटील, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी डॉ. ओमप्रकाश शेटे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद निलंगेकर यांच्या नावांचा समावेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या सर्व नावांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी स्वीय सहाय्यक म्हणून कार्य केलेले डॉ. ओमप्रकाश शेटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. पक्ष संघटन, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव आणि सातत्याने पक्षवाढीसाठी घेतलेली मेहनत यामुळे डॉ. शेटे यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.

डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी राज्याच्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत भाजपच्या विचारसरणीचा प्रचार ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने काम केले आहे. संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील कार्यकर्त्यांना बळ देणे आणि पक्षाच्या कार्यक्रमांना जनतेपर्यंत पोहोचविणे यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांतील भाजप कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नावाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपकडून उमेदवारी देताना केवळ राजकीय वजन न पाहता संबंधित उमेदवाराची संघटन क्षमता, मतदारसंघातील प्रभाव, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि पक्षाला मिळणारा प्रत्यक्ष राजकीय फायदा या निकषांवर विचार केला जाणार आहे. त्यामुळे “जो पक्षाला जास्तीत जास्त रिझल्ट देईल, त्यालाच न्याय” या भूमिकेतून केंद्रीय नेतृत्व निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून भाजपकडून सक्षम आणि सर्वमान्य चेहऱ्याला उमेदवारी दिली जाणार आहे. अशा परिस्थितीत डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या नावाला अधिक वजन मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू आणि पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेणारा नेता म्हणून ओळख असलेल्या डॉ. शेटे यांना उमेदवारी मिळाल्यास बीड भाजपाला नवचैतन्य मिळू शकते.

आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने देते, याकडे बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT