

हिंगोली : परभणी-हिंगोली विधान परिषदेचा महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण याची उत्सुकता असताना गत निवडणुकीत गाजलेल्या हापूस बॉक्स पॅटर्नची यंदाही पुनरावृत्ती होण्याची चर्चा झडत असून यंदा भाव तब्बल 10 लाखांवर जाण्याची कुजबूज आतापासूनच सुरू झाली आहे. हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघासाठी 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे.
गेल्या निवडणुकीत मतदारांच्या ‘भावाची’ मोठी चर्चा रंगली होती. त्यावेळी 2 ते 5 लाखापर्यंत व्यवहार झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र यावेळी बदललेली राजकीय समिकरणे, महायुतीतील अंतर्गत स्पर्धा आणि मर्यादीत मतदार संख्या यामुळे हा भाव 10 लाखांच्या घरात पोहोचू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य मतदार संघाचा इतिहास नेहमीच राजकीय नाट्याने भरलेला राहिला आहे.
पुर्वी इच्छुक उमेदवारांकडून मतदारांकडे मिठाईचे बॉक्स पाठवून उमेदवारीची सॉफ्ट एन्ट्रीची माहिती दिली जात असे. गत निवडणुकीत अकोल्याच्या उपऱ्या उमेदवाराने मतदारांना दिलेल्या हापूस आंब्यांच्या पेट्याची आठवणी आता या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे मावळते आमदार विप्लव बाजोरिया यांनी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील काही मतदारांना काही दिवसांपुर्वीच आमरसासाठी टोकन म्हणून हापूस आंब्याच्या पेट्या दिल्याची चर्चा सुरू होती. आता तर चक्क निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
25 मे पासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार असल्याने हिंगोलीत राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघात सध्या हायहोल्टेज राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. या जागेवर सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विप्लव बाजोरिया आमदार आहेत.
आता मात्र महायुतीमधील इतर दोन मित्र पक्षांनीही येथे दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच पहावयास मिळत आहे. शिंदे सेनेकडून विप्लव बाजोरिया, सईद खान, राम कदम, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर इच्छुक आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून देखील अनेकांची नावे चर्चेत आली आहेत.
यामध्ये प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे, संतोष मुरकूटे, मिलींद यंबल यांची नावे आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीत शांतता असली तरी काँग्रेसकडून सिद्धार्थ हत्तीअंभीरे, माजी आमदार सुरेश देशमुख, ठाकरे गटाकडून डॉ. विवेक नावंदर यांचे नाव चर्चेत आहे. जागा एक आणि मित्र पक्षांचे दावे अनेक अशी परिस्थिती दोन्ही आघाड्यांमध्ये निर्माण झाली आहे. आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांनी मुंबई गाठून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि लॉबिंग सुरू केली आहे.
बाजोरिया पिता-पुत्र सुनेत्रा पवारांच्या भेटीला
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे मावळते आमदार विप्लव बाजोरिया यांनी मागील सहा वर्षात मतदार संघाकडे वळूनही पाहिले नाही. आता निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया या पिता-पुत्रांनी पुन्हा एकदा जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. विशेष म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट चर्चेची ठरत आहे.
हिंगोलीतील इच्छुकांची लॉबिंग
विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच हिंगोलीतील इच्छुकांनी आपआपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केल्याचे समोर आले आहे. भाजपचे मिलींद यंबल यांनी आमदार तान्हाजी मुटकुळे यांना सोबत घेऊन सोमवारी थेट वर्षा निवासस्थान गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. तर माजी आमदार गजानन घुगे यांनी देखील उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे जोर लावला आहे. मंगळवारी सायंकाळी ते पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या आठवड्यात उमेदवारीबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.