MLA Suresh Dhas : धोंडे, आजबे स्वार्थासाठी एकत्र आले file photo
बीड

MLA Suresh Dhas : धोंडे, आजबे स्वार्थासाठी एकत्र आले

जलआक्रोश मोर्चावर आमदार सुरेश धस यांचा घणाघात

पुढारी वृत्तसेवा

MLA Suresh Dhas: Dhonde and Aajbe have come together for the sake of self-interest

आष्टी, पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार भीमराव धोंडे आणि आमदार बाळासाहेब आजबे हे विधानसभा निवडणुकीत स्वार्थासाठी एकमेकांविरोधात लढले. आता कार्यकर्ते उरले नसल्याने मतलबासाठी एकत्र आले असून, शासनाविरोधात विरोधी पक्षाने मोर्चा काढण्याऐवजी या दोघांनी मोर्चा काढून स्वतःचे हसे करून घेतले आहे, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी केली.

पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना धस यांनी धोंडे-आजबे यांच्या जलआक्रोश मोर्चावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुंटेफळ साठवण तलाव येथे आले असता पाटोदा व शिरूर तालुक्यांसाठी जायकवाडी प्रकल्पातून ३.५७ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाटोदा-शिरूर कासार उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाची मागणी आपण केली होती. त्यापूर्वी ७ जानेवारी २०२५ रोजी याबाबत पत्रही दिले होते. त्यानंतर शासनाने २८ जानेवारी २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

या योजनेचे सर्वेक्षण खासगी संस्थेमार्फत पूर्ण झाले असून, त्यासाठी आपण स्वतः २७ लाख रुपये खर्च केल्याचा दावा धस यांनी केला. शिरूर कासार भाजप मंडळाध्यक्ष सुरेश उगलमुगले, पाटोदा मंडळाध्यक्ष भागवत येवले आणि माऊली जरांगे यांनीही या कामासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच योजनेला मंजुरी मिळणार असल्याचा दावा करत धस म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत संवेदनशील आहेत. ही सर्व बाब माहिती असतानाही धोंडे आणि आजबे यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.

मोर्चाच्या बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्याचे कारण नाही; त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो लावून त्यांच्याच विरोधात मोर्चा काढावा, अशी टीकाही त्यांनी केली.

आष्टी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत धस यांनी धोंडे हे महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून, तर आजबे हे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढल्याचे सांगितले. दोघांचाही पराभव झाल्यानंतर आता ते एकत्र आल्याचे सांगत, "स्वार्थासाठी एकमेकांविरुद्ध लढले आणि मतलबासाठी एक झाले," अशी मिश्कील टिप्पणी धस यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT