Mla Namita Mundada : महिला सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचला file photo
बीड

Mla Namita Mundada : महिला सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचला

आ. नमिता मुंदडा यांची विधिमंडळात मागणी; समिती स्थापन करण्याची गृहराज्यमंत्र्यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

MLA Namita Mundada: Take immediate steps for women's safety

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवाः महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान आज सभागृहात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित स्मार्ट वेअरेबल उपकरणांच्या गैरवापराचा आणि महिला सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या वाढत्या धोक्याकडे सरकारचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी पुढील ३० दिवसांत एका विशेष समितीची स्थापना केली जाईल आणि ही समिती ४ ते ६ महिन्यांत आपला अहवाल सादर करेल, अशी घोषणा केली.

सभागृहात या विषयावर विस्तृत चर्चा झाली. आमदार नमिता मुंदडा यांनी स्मार्ट ग्लासेस आणि इतर वेअरेबल गॅझेट्सच्या माध्यमातून महिलांच्या गोपनीयतेला निर्माण झालेल्या धोक्यांवर चिंता व्यक्त केली. गृह विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सुरक्षा पोर्टल किंवा यंत्रणा कार्यान्वित करावी, जेणेकरून या उपकरणांच्या गैरवापराला वेळेत आळा बसेल, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र या तंत्रज्ञान नियमनात देशासाठी आदर्श ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. एआय तंत्रज्ञानाचा वापर जागतिक पातळीवरून कुठेही केला जाऊ शकत असल्याने केंद्र सरकार देखील यावर धोरण तयार करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांनुसार आणि विविध विभागांच्या एसओपीच्या माध्यमातून कारवाई केली जाते. तरीही, सर्व संबंधित विभागांची एक संयुक्त सुरक्षा यंत्रणा किंवा पोर्टल तयार करण्याच्या प्रस्तावावर सरकार सकारात्मक असून त्यावर योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन मंत्र्यांनी सभागृहाला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT