

एस. एम. जोशी तथा अण्णा हे स्वातंत्र्यसेनानी. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, पत्रकार, राष्ट्रसेवा दलाचे संस्थापकांपैकी एक होते. सानेगुरुजी व जयप्रकाश नारायण यांचे मानसपुत्रही होते. आमदार, खासदार होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. राजकारणात राहून समाजकारण करणारे अजातशत्रू होते. राजकारणातील ते एक राजहंस होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व राष्ट्रपतिपद भूषवावे असा आग््राह त्यांना केला गेला होता. जनता राजवटीवेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची संधी चालून आली होती; पण मार्क्सची ध्येये आणि गांधीजींची साधनसुचिता असणाऱ्या समाजवाद्यांमधील गांधीवादी व गांधीवाद्यांमधील समाजवादी असणाऱ्या अण्णांनी सर्व प्रतिष्ठेची पदे नाकारली. कारण, अण्णांना सरकारी गाडीवरील लाल दिव्यापेक्षा सेवेचा नंदादीप महत्त्वाचा वाटत होता. हीच नैतिकता त्यांनी वैयक्तिक जीवनातही जपली होती. मुलाला मेडिकलला प्रवेश संस्था किंवा मंत्री कोट्यातून देण्यासाठी शब्द टाकावा, असा आग््राह त्यांच्या पत्नी ताराबाईंनी केला; पण त्याला अण्णांनी स्पष्ट नकार दिला. राजकारणात, समाजकारणात साधनसुचिता महत्त्वाची असते, याचा आदर्शच त्यांनी घालून दिला.
अण्णांचा राजकीय प्रवास काँग््रेास समाजवादीपासून समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष नंतर संयुक्त समाजवादी पक्ष व अखेर जनता पक्ष असा झाला; पण हा प्रवास लाल दिव्याच्या गाडीसाठी नव्हता, तर वैचारिक लढ्यासाठी होता. एका सामाजिक प्रश्नावर विधानसभेत अण्णा लालबूंद होऊन तावातावाने सत्ताधाऱ्यांवर बरसू लागले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण उभे राहिले व हसत म्हणाले, ‘अण्णा आता फार तासललात व यापूर्वीही तुम्ही आमची फार वेळा तासललीत. आता पुरे करा की!’ यावर सभागृहात हास्य पसरले. स्वातंत्र्यचळवळीत अण्णांना शिक्षा झाल्याने ते ज्या जेलमध्ये होते, तिथेच यशवंतराव चव्हाणही होते. जेलमध्ये विविध कामे दिली जात; पण अण्णा प्रकृतीने शिडशिडीत असल्याने त्यांना जेलमधील लोकांची दाढी करण्याचे काम दिले होते. तेव्हा ते यशवंतरावांसह बऱ्याच जणांची दाढी करत असत. तो धागा पकडूनच यशवंतरावांनी ही कोटी केली होती.
अण्णांची कोल्हापुरातीलच एक आठवण आहे. चंद्रशेखर यांची पदयात्रा कर्नाटकातून कोल्हापूरला येणार होती व त्यांच्या स्वागताला एम. एम. अण्णा, शंकर धोंडी पाटील व आम्ही कार्यकर्ते शिवाजी विद्यापीठाजवळ नाक्याजवळ थांबलो होतो. एस. एम. अण्णा कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत होते. शंकर धोंडी पाटलांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय काढला. जनता पक्षाचे 98 आमदार, शे. का. पक्षाचे तेरा आमदार व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 9 आमदार असे 120 आपल्या डाव्या पक्षाचे आमदार असताना अपक्ष 36 असताना व शरद पवार यांनी केवळ 40 आमदार घेऊन आल्यानंतर अण्णा शरद पवारांऐवजी आपल्यातले बापू काळदाते, निहाल अहमद तुम्हाला दिसले नाहीत काय? त्यावर अण्णा म्हणाले, शरद बहुजन समाजातला तरुण आहे. त्याने आपला कार्यक्रम स्वीकारला आहे. त्यावर शंकर धोंडी पाटील म्हणाले, मीही बहुजन समाजातला आहे. मी काय चुणचुणीत नाही का? तुम्हीच मुख्यमंत्री झाला असता, तर चालले असते की? तुम्हाला कोण बाह्मण म्हटले असते? यावर एस. एम. म्हणाले, याचे उत्तर शोधण्याचे काम तुझ्यावरच सोपवतो.
ते अजातशत्रू होते. संरक्षण साहित्य बनवणाऱ्यांची व भांडी बनवणाऱ्यांची संघटना अण्णांनी बांधली. एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी ते लढले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी केलेला अण्णांचा पर्वती सत्याग््राह गाजला. अण्णा म्हणाले होते, समाजजीवन अनुप्रणीत होऊन एक नवे चैतन्य संचारेल. तसे झाले म्हणजे जाती-मातीचे अहंकार निष्प्रभ होतील. जातीय भावना झडत जाईल, जुनी समाज व्यवस्था ढासळून नवसमाजाचा पाया घातला जाईल. जातींची ही डबकी फोडूनच लोकजीवन प्रवाही करता येईल. ते शुद्ध होत जाईल. अशाप्रकारे खालपर्यंत समाज ढवळून निघेल, तेव्हा नवीन नेतृत्व उदयास येईल व मग त्याच्या जोरावर सत्ता हस्तगत केली, तरच लोकांचे प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य जनतेच्या सहकार्याने सत्ताधाऱ्यांच्या ठिकाणी येईल. अण्णांचे हे स्वप्न पूर्ण होण्याबाबत आशावादी राहावे लागेल.