Parli Vaijnath Municipal Council MIM Ends Alliance
परळी वैजनाथ : परळी वैजनाथ नगरपरिषद गटनेता निवडीमध्ये परळीतून निवडून आलेल्या एकमेव एआयएमआयएम पक्षाच्या नगरसेविकेने शिवसेना शिंदे गटाचा समावेश असलेल्या राष्ट्रवादी व मित्र पक्ष गटामध्ये सामील होत गटनेत्याला पाठिंबा दिला होता. या अनोख्या युतीमुळे चौफेर वादंग निर्माण झाले होते. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व एआयएमआयएम यांची युती झाल्यामुळे टिका, टिप्पण्या व चर्चांनी राजकीय रान पेटले होते. यानंतर आता परळीत राजकीय उलथापालथ झाली असून परळी नगरपरिषद राष्ट्रवादी व मित्रपक्ष गटात सामील झालेल्या एआयएमआयएमने या गटातून बाहेर पडत काडीमोड घेतला आहे. अशा प्रकारची अधिकृत घोषणाच एआयएम आयएमने एका पत्राद्वारे केली आहे.
परळीमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला मिळाले होते. या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा राज्यपातळीवरील राजकारणात झाली. भाजप आणि एआयएमआयएम हे अकोट नगरपरिषदेत एकत्र आल्याची प्रचंड चर्चा व राजकीय उलथापालथ झालेली असतानाच परळीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी एआयएमआयएमच्या एकमेव निवडून आलेल्या सदस्याला गटनेता निवडीत एकत्र घेतले.
यावरूनही राज्यात मोठा राजकीय धुरळा उठला. एका बाजूला एआयएमआयएमच्या नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यांसमोर गटनेता निवडतांना अधिकृत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गटात सामील झाल्या होत्या नंतर मात्र आमची 'युती' झाली नसल्याची सारवासारव करण्याची भूमिका त्यांनी घेतली. परळी नगरपरिषदेतील विविध पक्ष व गटांच्या गटनेत्याची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट -16 , शिवसेना शिंदे गट - 2, एमआयएम - 1, अपक्ष - 4 अशा 24 सदस्यांचा समावेश असलेला गट स्थापित करण्यात आला. या गटामध्ये एआयएम आयएमच्या एकमेव निवडून आलेल्या न.प.सदस्या शेख आयशा मोहसीन यांचाही समावेश होता. परळीत नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. तर 35 नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस - 16 ,शिवसेना शिंदे गट - 2, भाजपा - 7,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 2, काँग्रेस - 1, एआयएमआयएम -1, अपक्ष -6 असे संख्याबळ आहे.
परळी नगर परिषदेमध्ये भाजपने आपला स्वतंत्र गट स्थापित केला असुन भाजपच्या गटात अपक्ष सहापैकी दोन न.प.सदस्य सामिल झाले आहेत.त्यामुळे परळी नगर परिषदेत भाजपचा गट 9 जणांचा झाला आहे. सभागृह गटनेता निवडीत स्थापित गटांचा विचार करता राष्ट्रवादीचा 24 जणांचा सर्वात मोठा गट तयार झाला असुन महायुतीतील दुसरा प्रमुख पक्ष असलेला भाजपचा गट 9 जणांचा झाला आहे. भाजपाच्या गटनेचे पदी प्रा. पवनकुमार मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. परळी नगर परिषदेत महायुती आणखी भक्कम झाली असुन 36 पैकी 33 असे सभागृहात महायुतीचे संख्याबळ दिसणार आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेस 1 असे उर्वरित संख्याबळ असणार आहे.
दरम्यान, एआयएमआयएम पक्षाने आता राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या गटात आम्ही सहभागी नसून या गटातून बाहेर पडत असल्याचे पत्र काढले आहे. जिल्हाधिकारी यांना एआयएम आयएमचे शहराध्यक्ष मोहसिन शेख यांनी अधिकृत पत्र देऊन एआयएमआयएम या गटातून बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. एआयएमआयएम पक्षाच्या न.प. सदस्या आयेशा मोहसीन शेख यांनी प्रभाग व शहराच्या एकात्मिक विकासाचा विचार करून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही पाठिंबा दिला होता मात्र या गटांमध्ये शिवसेना शिंदे गट ही सहभागी आहे. वैचारिक दृष्टीने आम्ही त्यांच्यासोबत एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे या गटातून आम्ही बाहेर पडत आहोत. आमची कोणतीही कटुता नाही मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशाला अनुसरून आपण या गटातून बाहेर पडत असल्याचे नगरसेविका आयेशा मोहसीन शेख यांनी या पत्रात नमूद केले आहे.
परळी नगर परिषदेच्या गटनेता निवडीत एआयएमआयएम च्या नगरसेविकेला गटात सामील करून घेतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेवर चारी बाजूंनी टीका झाली. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी पत्रकार परिषद घेऊन एआयएमआयएम च्या सदस्याला गटाबाहेर काढून टाका अन्यथा गटातून बाहेर पडण्याची आम्हाला परवानगी द्या अशा प्रकारची एक प्रकारे तंबीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली होती. या सर्व राजकीय घडामोडीनंतर आज एआयएमआयएम पक्षाच्या वतीने स्वतःहून या गटातून बाहेर पडत असल्याचे पत्र पुढे आले आहे.