Parli Vaijnath Municipal Council Election Results 2025 | परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांचा धक्कादायक पराभव

देशमुखांनी मुंडे आणि महायुतीविरुद्ध दंड थोपटल्यामुळे ही जागा संपूर्ण तालुक्यात प्रतिष्ठेची बनली होती.
Parli Vaijnath Municipal Council Election Results 2025 | परळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांचा धक्कादायक पराभव
Published on
Updated on

परळी वैजनाथ: राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला. निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांना मतदारांनी नाकारले आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक लढवणाऱ्या देशमुखांचा महायुतीच्या उमेदवारांनी धुव्वा उडवला असून, हा शरद पवार गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

नेमकी लढत काय होती?

अनेक वर्षे धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपक देशमुख यांनी निवडणुकीपूर्वी 'धक्का तंत्रा'चा वापर करत शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली होती, तर देशमुख स्वतः प्रभाग ५ मधून नगरसेवक पदासाठी रिंगणात होते. मुंडे आणि महायुतीविरुद्ध दंड थोपटल्यामुळे ही जागा संपूर्ण तालुक्यात प्रतिष्ठेची बनली होती.

निकालाचे चित्र: महायुतीचे वर्चस्व

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच प्रभाग ५ च्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, पहिल्याच फेरीत चित्र स्पष्ट झाले. महायुतीचे उमेदवार अंजली माळी आणि व्यंकटेश शिंदे यांचा विजय झाला. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक देशमुख यांना मोठा पराभव पत्करावा लागला. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत देशमुखांच्या आव्हानाला सपशेल मोडीत काढले.

बंडखोरी ठरली अपयशी

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन दिग्गज नेत्यांविरुद्ध राजकीय बंडाचे निशाण फडकवणे दीपक देशमुख यांना महागात पडल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला सत्तेची ताकद आणि दुसरीकडे पक्षांतराचा प्रयोग, यामध्ये परळीच्या मतदारांनी महायुतीला पसंती दिली आहे. या पराभवामुळे परळीतील शरद पवार गटाच्या विस्ताराला खीळ बसली असून, आगामी राजकारणावर याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news