Beed Khamgaon Farmer Death
परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील खामगाव येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना आज (दि.३) सकाळी उघडकीस आली. प्रल्हाद अंकुश बडे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मागील काही वर्षांपासून त्यांना सततच्या नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेत ते नेहमीच असत, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार ही घटना अर्थिक विवंचनेतून झाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अधिक तपासानंतर कारण स्पष्ट होणार आहे.