Marijuana worth Rs 13 lakh seized in Ambajogai
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा बीड जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले असून अंबाजोगाई येथे तब्बल १३ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही कामगिरी बजावली.
जिल्ह्यात अंमली पदार्थ साठा, लागवड, विक्री व वाहतूक याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, सटवाजीनगर परिसरातील ड्रीमसिटी येथे चारचाकी वाहनातून गांजाची अवैध वाहतूक होणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत सिमेंट रोडवर उभी असलेली पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी ताब्यात घेतली. वाहनाची झडती घेतली असता दोन निळ्या प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये पान, फुले, बिया व बोंड असलेला, उग्र वासाचा सुमारे २८ किलो ओलसर गांजा आढळून आला.
जप्त केलेल्या गांज्यासह वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण १३ लाख ७० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी प्रतीम राम तरकसे (वय २७, रा. आडस, ता. केज, जि. बीड) याच्यासह प्रतिक भगवान पाटोळे, अजय पाटोळे (दोन्ही रा. आसरडोह, ता. धारूर, जि. बीड) आणि अजय देवकर (रा. अंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, शिंदे तसेच संबंधित पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पार पाडली. जिल्ह्यात सुरू असलेल्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेमुळे अवैध धंद्यांवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.