Manoj Jarange Patil Patoda Meeting Pudhari
बीड

Manoj Jarange Patil: बीडच्या पाटोद्यात रात्री २ वाजता मनोज जरांगेंची सभा; ‘माझ्या मागे येऊ नका, नाहीतर...’, आंदोलकांना दिला इशारा

Manoj Jarange Patil Patoda Meeting: मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा बीडच्या पाटोद्यात दाखल झाले, त्यांना ऐकण्यासाठी हजारो मराठा समाजबांधव आणि महिला उपस्थित होत्या.

Rahul Shelke

Manoj Jarange Patil Patoda Meeting: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचा रात्रीचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे झाला. नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्यानंतर ते रात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास पाटोद्यात दाखल झाले. मात्र, उशीर होऊनही जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी पाटोदा परिसरातून हजारो मराठा बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पाटोद्यात पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करताना, शरीर साथ देत नसल्याचे सांगितले. तसेच, मराठा आरक्षणाचा लढा महत्त्वाचा असून आपल्या दौऱ्यापेक्षा आरक्षणाची मागणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“तुमच्यासमोर खणखणीत बोलत असतो, पण आता बोलताही येत नाही. समाज माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्या समाजाला मोठं करायचं आहे. सगळ्यांनी लढायला शिकलं पाहिजे,” असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

आपल्या उपोषणाला १८ दिवस पूर्ण झाल्याचा उल्लेख करत जरांगे पाटील म्हणाले की, सलाईन घेतल्यानंतर काही काळ बरं वाटलं होतं. मात्र, १२ तारखेला सलाईन सोडल्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाला. “आज मला हात-पाय हलवता येत नाहीत. माझ्या समाजाच्या लेकरांसाठी लढताना शरीर थकलं आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांमधून त्यांना सलाईन घेण्याची विनंती करण्यात आली. “तुमच्यासाठी मी सरकारला अंगावर घेतलं आहे. शरीरापेक्षा आरक्षणाचा लढा महत्त्वाचा आहे; मात्र उपोषणाच्या काळात दौरा करणं मला आता शक्य होत नाही,” असे जरांगे पाटील म्हणाले.

‘माझ्या मागे येऊ नका’, जरांगेंचे आवाहन

पाटोद्यातील सभेत जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना महत्त्वाचे आवाहन केले. पुढील प्रवासात आपल्या मागे मोठ्या संख्येने वाहने घेऊन येऊ नका, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

“उद्या पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे येऊ देऊ नका. तुम्ही माझ्या मागे येणार असाल तर मी पुन्हा अंतरवाली सराटीत जाईन. नाहीतर पाटोद्यातच उपोषण सुरू करीन,” असा इशारा त्यांनी दिला.

आपल्याला पुढील दौरा करणे शक्य होईल की नाही, याबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली. “मला पुढचा दौरा आता शक्य होत नाही. मी पाटोद्यातून पोलिसांना सांगून थेट मुंबईला जाईन,” असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

‘आरक्षण महत्त्वाचं, दौरा नाही’

आपल्या प्रकृतीपेक्षा आरक्षणाची मागणी महत्त्वाची असल्याचे सांगताना जरांगे पाटील म्हणाले, “आरक्षण महत्त्वाचं आहे, दौरा महत्त्वाचा नाही. माझ्याकडून आता पुढचा दौरा शक्य होत नाही.”

प्रकृतीमध्ये सुधारणा झाली तर पुढील दौऱ्यात सहभागी होऊ, मात्र त्रास कायम राहिला तर प्रवास करणे शक्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘५८ लाख नोंदी मिळाल्या’

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात बोलताना जरांगे पाटील यांनी ५८ लाख नोंदी मिळाल्याचा दावा केला. या नोंदींच्या आधारे मोठ्या संख्येने समाज आरक्षणाच्या प्रक्रियेत गेल्याचे त्यांनी सांगितले. आता गॅझेटसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“पेनड्राइव्हमध्ये सगळ्या नोंदी घेतल्या आहेत. सरकारने काहीही केलं तरी नोंदी आपल्या हातात आहेत. आपल्या हातात आता चेक आहे. आपण तो कधीही बँकेत टाकू शकतो. मराठे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत,” असे ते म्हणाले.

फडणवीसांवर गंभीर आरोप

सभेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले. फडणवीस यांच्यासोबत राजकीय संघर्ष सुरू असल्याचे सांगताना त्यांनी “देवेंद्र फडणवीस यांना तोडीस तोड डाव टाकतोय,” असे म्हटले. तसेच, आपल्याविरोधात गोळीबाराच्या कटाचा आरोपही त्यांनी केला.

‘नेत्यावर किंवा पक्षावर प्रेम करू नका’

मराठा समाजाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी नेते किंवा पक्षापेक्षा आरक्षणाच्या मागणीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “तुम्ही नेत्यावर आणि पक्षावर प्रेम करू नका. आरक्षण मिळाल्यावर करा,” असे ते म्हणाले.

“मी माझ्या कुटुंबाला सांगून आलोय, स्वाभिमानाने जगा. पोराला सांगितलंय, धाडसाने पुढे चला. मी समाजासाठी गेलो तर पुढे गाडा चालवा,” असेही त्यांनी सांगितले.

‘पाटोद्यातील लोक कणखर आहेत’

पाटोदा येथे आलेल्या मोठ्या जनसमुदायाचे कौतुक करताना जरांगे पाटील म्हणाले की, “पाटोद्यासारखे कणखर लोक कुठेही नाहीत. इथले सर्वजण झटणारे आहेत.”

रात्री उशिरापर्यंत आपल्या भाषणासाठी थांबलेल्या समाजबांधवांचे त्यांनी आभार मानले. मात्र, पुढील प्रवासात आपल्या मागे येऊन गर्दी करू नये, अशी विनंती त्यांनी केली.

शेवटी आपल्या प्रकृतीचा दाखला देत जरांगे पाटील म्हणाले, “आता माझ्याकडून होत नाही. माझ्या पाठीमागे येऊ नका, नाहीतर इथेच उपोषण सुरू करीन किंवा अंतरवालीला परत जाईन. मी आराम करतो, सकाळी पुन्हा भेटू.”

पाटोद्यातील या मध्यरात्रीच्या सभेमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT