शेतकऱ्यांसाठी उप कालवा व्हावा pudhari photo
बीड

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांसाठी उप कालवा व्हावा

मनोज जरांगे पाटील यांची मागणी; कृषी प्रदर्शनाचा समारोप; अकरा शेतकऱ्यांना कृषी रत्न पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

गेवराई ः गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या मुख्य कालव्याला उप कालवे तयार करण्यात यावेत, अशी ठाम मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. आपला शेतकरी अत्यंत मेहनती असून तो रात्रंदिवस कष्ट करून शेती पिकवतो. मात्र योग्य पाणीपुरवठा व शेतमालाला हमीभाव मिळाल्यास शेतकरी अधिक सक्षम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे उप कालवे झाल्यास गेवराई तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील शेतीला मोठा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेल, उत्पन्न वाढेल आणि शेतकरी कधीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी आमदारांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी उपस्थित आमदार विजयसिंह पंडित यांना केली.

गेवराई येथील कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समोराप झाला. यावेळी जरांगे पाटील बोलत होते. यावेळी 11 शेतकऱ्यांना कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. पुरस्कार मिळालेले शेतकरी हे इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या मेहनतीला मिळालेली ही पोचपावती आहे. अशा पुरस्कारांमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे त्यांनी सांगितले.

आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले की, पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती, फळबागा, रेशीम शेती आणि नव्या तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांनी वळणे ही काळाची गरज आहे. एआय व आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्य आहे, हे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन यांत्रिकीकरण, शेतीसाठी उपयुक्त अवजारे व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पहायला मिळत असल्याने शेतकरी नवे प्रयोग करत असून हे प्रयोग त्यांना आर्थिकदृष्ट्‌‍या फायदेशीर ठरत आहेत, असे त्यांनी नमूद केले.11 कृषी रत्न पुरस्कारांबाबत बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, आज पुरस्कार मिळालेले शेतकरी हे केवळ सन्मानाचे मानकरी नसून ते आधुनिक शेतीचे आदर्श उदाहरण आहेत. त्यांच्या यशामुळे इतर शेतकऱ्यांनाही नवी दिशा व प्रेरणा मिळेल. भविष्यात अशा अधिकाधिक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी शासन व आयोजकांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रेशीम शेतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यात 15 कोटी रुपयांचा सिल्क पार्क प्रकल्प मंजूर झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या रेशीम उत्पादनाला योग्य भाव मिळेल आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी दिला. गेवराई येथे होणारे कृषी प्रदर्शन भविष्यात आणखी भव्य स्वरूपात व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करत आयोजक महेश बेदरे यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.दरम्यान, किसान कृषी विकास प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनात कृषीरत्न पुरस्कार वितरण व समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास आ. विजयसिंह पंडित, मनोज जरांगे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, अंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारख, बाप्पासाहेब तळेकर, त्रिशूळ पाटील, अजय दाभाडे, राजेंद्र दादा आतकरे, राजेंद्र मोटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 11 प्रगतशील शेतकऱ्यांना कृषी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बेदरे यांनी केले,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT