अनैतिक संबंध आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकतात याची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. तरी देखील अशा घटनांची पुनरावृत्ती होतच असते. बीड जिल्ह्यात मात्र काहीसा वेगळा प्रकार घडला... या प्रकरणात एकाच बॉयफ्रेंडवरून निर्माण झालेल्या वादात एका महिलेने आपल्याच मैत्रिणीचा घात केला. आता आरोपी महिलेला अटक झाल्याने तिचे कुटूंब उद्ध्वस्त झाले, तर दुसरीकडे खून झालेल्या महिलेची चार वर्षांची मुलगी अनाथ झाली.
उदय नागरगोजे, बीड
अयोध्या (27) हिचा विवाह गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील राहुल व्हरकटे याच्याशी सहा वर्षांपूर्वी झाला होता. तीन वर्षांपूर्वी राहुल व्हरकटे याचा अपघाती मृत्यू झाला. यानंतरही अयोध्या सासरीच राहात होती. त्याच ठिकाणी राहणार्या वृंदावणी फरतारे (40) हिच्याशी तिची जुनी ओळख होती. अयोध्याच्या पतीचे निधन झाल्याने ती पोलिस भरतीसाठी तयारी करत होती. या दरम्यानच तिची निवड गृहरक्षक दलामध्ये झाल्याने त्या ठिकाणी देखील ती सेवा देत होती. दरम्यानच्या काळात वृंदावणी फरतारे ही मुलाच्या शिक्षणासाठी बीड येथे राहायला आली त्यापाठोपाठ अयोध्या देखील पोलिस भरतीच्या तयारीकरिता बीडमध्ये दाखल झाली. जुनी ओळख असल्याने दोघींचे घरी येणे-जाणे असायचे. वर्षभरापासून दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या होत्या. परंतु या मैत्रीच्या घट्ट नात्यात वादाची ठिणगी पडली ती वृंदावणीच्या बॉयफ्रेंडवरून.
वृंदावणी ही मुलाच्या शिक्षणासाठी बीडमध्ये राहात असताना तिचे सतीश (नाव बदलले आहे) या तरुणाशी सूत जुळले होते. याबाबतची माहिती अयोध्याला होती. अयोध्याच्या पतीचे देखील तीन वर्षांपूर्वी निधन झाल्याने ती देखील आधाराच्या शोधात होती. अयोध्याशी ओळख झाल्यापासून सतीश वृंदावणीला टाळत होता आणि ही बाब वृंदावणीला खटकत होती. याबाबत वृंदावणीने सतीशला जाब देखील विचारला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
सतीश आपले ऐकत नाही, हे सगळे अयोध्यामुळे होत असल्याने वृंदावणीला याचा प्रचंड राग आला होता. यातून अयोध्या आणि वृंदावणीचा वाद देखील झाला होता. यादरम्यानच 18 ऑगस्टपासून अयोध्या बेपत्ता झाली. तिच्यासोबत बीडमध्ये राहणार्या एका मैत्रिणीने गावी फोन करून अयोध्या दोन दिवसांपासून रूमवर आली नसल्याचे सांगितले. यामुळे अयोध्याचा भाऊ तातडीने बीडमध्ये दाखल झाला आणि 20 ऑगस्ट रोजी बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यात आली. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी अयोध्याचा शोध सुरू केला असता 21 ऑगस्ट रोजी बीडमध्ये राहणार्या एका तरुणाकडून महत्त्वाची माहिती हाती आली. त्यानुसार पोलिसांनी वृंदावणीला ताब्यात घेतले आणि घटनेचा उलगडा झाला.
अयोध्या ही 19 ऑगस्ट रोजी बीड शहरातील पांगरी रोड भागातील वृंदावणीच्या घरी आली होती. त्या ठिकाणी सतीशच्या कारणातून दोघींमध्ये वाद झाला आणि या वादातून वृंदावणीने अयोध्याचा गळा दाबून खून केला. यावेळी घरी इतर कोणीही नसल्याने अयोध्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न वृंदावणीसमोर होता. वृंदावणीचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर तिने त्याला शेजार्यांची गाडी घेऊन ये असे सांगितले. त्यानुसार मुलाने शेजार्याची स्कूटी आणली. वृंदावणीने मुलाला पोत्यात कचरा भरला असून तो टाकायचा असल्याचे सांगितले आणि एका पोत्यात टाकलेला अयोध्याचा मृतदेह घेऊन बीड शहराबाहेर असलेल्या एका मोठ्या नाल्याच्या परिसरात हे दोघे गेले. तेेथे दाट झाडीत अयोध्याचा मृतदेह टाकून परत आले. परत आल्यानंतर अयोध्याने ही दुचाकी पाण्याने धुऊन शेजार्यांना परत केली. वृंदावणीला वाटले, आता आपण या प्रकरणातून सुटलो. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 22 ऑगस्ट रोजी या नाल्याच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली.
पोलिस निरीक्षक किशोर पवार, स.पो.नि. गजानन क्षीरसागर, रवींद्र अघाव, अभिजित सानप, रणदिवे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हा मृतदेह अयोध्याचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी वृंदावणीच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये वृंदावणी आणि तिचा मुलगा एका स्कूटीवर पोत्यामध्ये अयोध्याचा मृतदेह घेऊन जात असल्याचे फुटेज हाती लागले. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणारी वृंदावणी हिला हे फुटेज दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली.
या प्रकरणात अयोध्याच्या भावाच्या तक्रारीवरून वृंदावणी व तिच्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अधिक तपास स.पो.नि. गजानन क्षीरसागर हे करत आहेत.
दोन चांगल्या मैत्रिणींचा जीव एकाच तरुणावर जडला आणि त्यात एकीला आपल्या प्राणाला मुकावे लागले तर दुसरी आता पोलिस कोठडीत आहे. या सर्वांचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला असून अयोध्याची चार वर्षांची मुलगी आता अनाथ झाली आहे. वडिलांच्या निधनानंतर ज्या आईचा आधार होता तीच आता या जगात नाही; तर दुसरीकडे ज्या मुलाच्या भविष्याकरिता, शिक्षणाकरिता वृंदावणीला तिच्या पतीने बीडमध्ये ठेवले. स्वतः शेतात काबाडकष्ट करून मुलगा आणि पत्नीला बीडमध्ये पैसे पाठवले, तो पती आज मानसिक धक्क्यात आहे. ज्या मुलाला अधिकारी बनवण्यासाठी बीडमध्ये आणले, त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून किती विध्वंसक घटना घडू शकतात, हेच यातून समोर आले.