गेवराई : मराठी मुलीबद्दल शृंगारवाडीत केलेल्या वादग्रस्त विधानावरून गेवराईतील तलवाडा पोलीस ठाण्यात प्रा.लक्ष्मण हाके यांच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराईच्या शृंगारवाडीत ओबीसीच्या मेळाव्यात बोलताना प्रा.लक्ष्मण हाके यांनी मराठा समाज आणि मुलीबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मराठा समाजातील मुलीचे लग्न आता आमच्या मुलासोबत लावा या विधानाने बीड जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. रविवारी(ता.१४) तलवाडा पोलीस ठाण्यात हाकेच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून, या शिवाय गेवराई पोलिस ठाण्यात देखील मराठा समाज हाकेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी एकवटला होता. याबाबतचे निवेदन गेवराई पोलीसांना दिले आहे.
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या विरोधात लक्ष्मण हाके हे देखील रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी गेवराईच्या बागपिंपळगावात परवानगी न घेता समाज जमावल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असताना शृंगारवाडीत मराठा समाज आणि मराठा मुलीबद्दल वादग्रस्त विधान केल्याने गेवराईतील मराठा समाज आक्रमक झाला आहे.यावरुन रविवार तलवाडा पोलीस ठाण्यात प्रा.हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठिकठिकाणचे मराठा समाजाने हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात एकवटला आहे.