कोळगाव येथील १० शेतकऱ्यांच्या सौर मोटरचे वायर चोरीला  Pudhari Photo
बीड

Farmers Solar Motor Wire Theft |कोळगाव येथील १० शेतकऱ्यांच्या सौर मोटरचे वायर चोरीला

अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ; पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : एकीकडे अतिवृष्टी, पूर आणि निसर्गाच्या संकटाने शेतकऱ्यांचे जगणे आधीच कठीण झालेले असताना आता चोरीच्या घटनांनी त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे एकाच रात्री १० शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरीवर बसवलेले सौर मोटरचे वायर चोरीला गेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण आहे.

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी बाबासाहेब गोविंद येडे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतात शासनमान्य सौर ऊर्जेवर चालणारी विहिरीवरील मोटर बसवण्यात आली होती. दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी नियमितप्रमाणे शेतातील काम पूर्ण केले आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ५ ऑक्टोबर रोजी जेव्हा शेतावर गेले, तेव्हा मोटरचा केबल वायर पूर्णपणे चोरीला गेल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर परिसरात पाहणी केली असता बाबासाहेब येडे यांच्यासह तात्यासाहेब सखाराम तळेकर, रामदास किसन येडे, सुमित्रा महादेव बहिर, मिठू विठ्ठल बहिर, धोंडिराम यशवंत येडे, जगन्नाथ बाजीराव येडे, अजिनाथ राधाकिसन शेळके, भगवान नामदेव खुटाळे, जालिंदर विठ्ठल शेळके, परसराम उत्तम तळेकर यांच्या देखील विहिरीवर बसवलेले सौरपंपाचे वायर चोरट्यांनी लंपास केले.

एक सौरपंप वायर अंदाजे १२५ फूट लांबीचा असून किंमत सुमारे २० ते २५ हजार इतकी आहे. त्यामुळे या घटनेत जवळपास अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही चोरी रात्रीच्या वेळी झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली, माती साचली, सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत सौर मोटरच्या वायरची चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन पुन्हा ठप्प झाले असून या घटनेमुळे त्यांच्या हालअपेष्टांत अधिक भर पडली आहे.

दरम्यान शेतातील विहीरीवर अशा चोरीच्या घटना घडत असतील तर शेतकऱ्यांचे मनोबल खचणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांवर तातडीने कारवाई करून गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT