केज : केज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत केवड येथील सरकारी गायरान जमिनीत बेकायदेशीररीत्या लावलेली १५ लाख रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ७ सप्टेंबर रोजी केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना केवड येथील पारधी वस्तीजवळील सरकारी गायरान जमिनीत गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहिती मिळताच त्यांनी डीबी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर, अमीरुद्दीन इनामदार आणि सहकाऱ्यांनी महसूल अधिकारी व पंचांना सोबत घेऊन केवड शिवार येथील सर्वे नं. २२७ मध्ये छापा टाकला.
या कारवाईदरम्यान सुनील शिवाजी पवार (रा. केवड गायरान) यांच्या पत्र्याच्या शेड समोरील परिसरात गवताच्या आड लावलेली गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी नायब तहसीलदार फुलचंद हांगे आणि पंचासमक्ष ७४.४३२ किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली. त्याची बाजारभावानुसार किंमत १४ लाख ८८ हजार ६४० रुपये एवढी आहे.
पोलिस उपनिरीक्षक अमिरुद्दिन इनामदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील पवार याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.