

घनसावंगी : तालुक्यात यंदा पावसाने पुरेशी साथ न दिल्याने खरीप हंगामासह ऊसउत्पादक शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटत असतानाच आता ऊस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. आधीच उपलब्ध पाण्यावर पीक जगविण्यासाठी खर्च करावा लागत असताना रोग नियंत्रणासाठी महागडी औषधे व फवारणीचा खर्च वाढल्याने उत्पादनाचे आर्थिक गणित बिघडत आहे.
रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कीटकनाशके व बुरशीनाशकांचा खर्च, मजुरी तसेच यंत्राद्वारे फवारणीचा खर्च वाढला आहे. ड्रोन फवारणीसाठीही एकरी सुमारे ५०० रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. पाण्याची कमतरता, त्यात रोगराई आणि वाढता फवारणी खर्च यामुळे घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर 'दुष्काळात तेरावा महिना' अशी परिस्थिती ओढवली आहे.
पाणीटंचाईमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होत असतानाच रोगाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास उत्पादन व उसाचे वजन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. वर्षभर मेहनत आणि मोठी गुंतवणूक करून उभे केलेले पीक वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र पाण्याचा खर्च, महागडी औषधे आणि वाढता फवारणी खर्च यामुळे ऊस उत्पादकांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांना योग्य औषधांची माहिती व प्रभावी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
उपलब्ध आहे त्या पाण्यावर ऊस जगविण्याची धडपड सुरू आहे. त्यात आता उसावर रोग पडल्याने महागडी औषधे खरेदी करून फवारणी करावी लागत आहे. औषधांचा खर्च वेगळाच असून, त्यात ड्रोनद्वारे फवारणीसाठी एकरी सुमारे ५०० रुपये मोजावे लागत आहेत. पुन्हा फवारणीची वेळ आली तर खर्च आणखी वाढणार आहे.
नीलेश गुळवणे, ऊसउत्पादक शेतकरी
पाऊस कमी असल्याने आहे त्या पाण्यावर ऊस जगविण्यासाठी दिवस-रात्र धडपड करावी लागत आहे. आता रोगराईचे संकट उभे ठाकले आहे. महागडी औषधे घ्यावी लागत आहेत आणि त्यात ड्रोन फवारणीसाठी एकरी ५०० रुपये अतिरिक्त खर्च होत आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेला ऊस हातातून जाऊ नये, एवढीच चिंता आता सतावत आहे.
अमोल नाईकवाडे, ऊसउत्पादक शेतकरी