गौतम बचुटे / केज :
मेंढ्या सांभाळत भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळ कुटुंबातील अल्पवयीन मुलगी पालकांनी रागाने बोलले म्हणून कोणालाही न सांगता वस्तीवरून निघून गेली होती. ती कुठे तरी निघून गेल्याचे लक्षात येताच पालक घाबरले आणि त्यांनी तत्काळ केज पोलिसांशी संपर्क साधला. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे यांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत अवघ्या २४ तासांच्या आत त्या मुलीचा शोध घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले.
या संदर्भातील माहिती अशी की, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मेंढपाळ कुटुंबे सध्या बीड जिल्ह्यात आलेली आहेत. त्यापैकी काही मेंढपाळ केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या परिसरात वस्ती करून राहिलेले आहेत.
याच मेंढपाळ कुटुंबातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २६ जानेवारी रोजी घरातील पालकांनी रागाने बोलले म्हणून कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. ती मुक्कामी वस्तीवर दिसत नसल्याचे लक्षात येताच पालक घाबरून गेले. त्यांनी तातडीने केज पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी पोलीस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे यांना ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
आदेश मिळताच पोलीस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे यांनी सायबर सेलचे विक्की सूर्यवंशी यांच्या मदतीने त्या मुलीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी तिच्या जवळील मोबाईल वारंवार चालू-बंद करत असल्याने प्रत्येक वेळी लोकेशन बदलत होते आणि तपासात अडथळे येत होते.
दि. २७ जानेवारी रोजी तिचे अंतिम लोकेशन केज तालुक्यातील कुंबेफळ येथे आढळून आले. अंतिम लोकेशन स्पष्ट होताच पोलीस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे, वाहन चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंभूदेव दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सानप आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर गोरे यांनी तातडीने कारवाई करून सदर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला केज येथे आणून तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द करण्यात आले.
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत अवघ्या २४ तासांत यशस्वी कारवाई करून मुलीला पालकांच्या ताब्यात दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.