

येल्लूर येथून मुखेड आगाराची लालपरी तीर्थयात्रेसाठी रवाना.
एसटी संगे तीर्थयात्रा योजनेचा मुखेड आगारातून पहिला प्रयोग.
२३ जानेवारी २०२६ पासून राज्यातील २५१ आगारांत योजना सुरू.
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे व शक्तीपीठांचे दर्शन एका प्रवासात.
ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांसाठी सवलतींचा लाभ उपलब्ध.
मखेड (पुढारी वृत्तसेवा):-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुखेड आगारातून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थयात्रा योजना अंतर्गत मौजे येल्लूर येथून लालपरी रवाना करण्यात आली. मुखेड आगाराचे आगार प्रमुख सुभाष पवार यांनी या योजनेचा पहिला प्रयोग सुरू केला आहे.
सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी नाळ जोडून त्यांच्या श्रद्धेला सुरक्षिततेची आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी ही लोकाभिमुख योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साकारली आहे. दि. २३ जानेवारी २०२६ पासून ही योजना राज्यातील २५१ आगारांमध्ये एकाच वेळी राबविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने योजनेला प्रतिसाद देत मुखेड आगार प्रमुख सुभाष पवार यांनी पहिल्याच दिवशी म्हणजे दि. २३ जानेवारी रोजी तालुक्यातील मौजे येल्लूर येथून तीर्थयात्रेसाठी लालपरीचा शुभारंभ केला. यावेळी आगार प्रमुख सुभाष पवार यांच्या हस्ते तीर्थयात्रा बसचा शुभारंभ करून प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर गाडी येल्लूर येथून तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर, देहू-आळंदी, जेजुरी, ज्योतिबा, कोल्हापूर, प्रतापगड, रायगड, गणपतीपुळे, नाणीज, नाशिक, त्रंबकेश्वर, सप्तगिरी, शिर्डी, परळी वैजनाथ येथे दर्शन करून परत मुखेड–येल्लूर येथे येणार आहे.
यावेळी आगार प्रमुख म्हणाले की, महामंडळाची ही योजना प्रवाशांना योग्य दरात विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घडवण्यासाठी सुरू करण्यात आलेली विशेष सेवा आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि शक्तीपीठांचे दर्शन घडविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
गावातील एखाद्या गटप्रमुखाने ४५ प्रवाशांची यादी व प्रवासाच्या ठिकाणांची माहिती दिल्यास मंजुरीनंतर लालपरी गाडीची व्यवस्था करण्यात येईल. सदर गाडीत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ योजना (७५ वर्षांपेक्षा जास्त वय), तसेच दिव्यांग व्यक्तींना सवलती लागू आहेत.
तालुक्यातील जास्तीत जास्त गावांतील प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख सुभाष पवार यांनी केले आहे. लालपरी व मुखेड आगाराचा ताफा भल्या पहाटे येल्लूर गावात पोहोचताच नागरिकांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले. यावेळी सत्यवान शिंदे पाटील, सूर्यकांत पवळे पाटील, चालक बी. एन. केंद्रे, वाहक बी. बी. गायकवाड तसेच गावातील महिला नागरिक उपस्थित होते.